डहाणू : नगरसेवक व नागरिक यांच्यात संवादाचा कार्यक्रम

0
956

शिरीष कोकीळ

DAHANU NAGAR PARISHAD NIVADNUK2दि. 1 : येत्या डिसेंबरमध्ये होणार्‍या डहाणू नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुका विकास परिषदेने आयोजित केलेल्या आजी माजी नगरसेवक व नागरिक यांच्यातील संवाद कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना बिनधास्त प्रश्‍न विचारावेत, असे आवाहन करण्यात आले होते.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या नियोजित डहाणू तालुका विकास परिषदेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम संयोजक मंडळ सदस्य सुधीर कामत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर परिषदेचे निमंत्रक, तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विषद करुन संवाद कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराच्या प्रथम नागरिक विद्यमान नगराध्यक्षा रमिला पाटील उपस्थित होत्या. माजी नगराध्यक्ष राजेश पारेख व शशिकांत बारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे उप नगराध्यक्ष प्रदीप चाफेकर, राजेंद्र माच्छी, माजी नगरसेवक श्री शैलेश व नगरसेविका सौ. रेणुका राकामुथा, सौ. कीर्ती मेहता, तारा तुकाराम बारी, प्रकाश माच्छी, सौ. रेखा अतुल माळी, सौ. आशा अरुण पाठक, मावळत्या परिषदेचे काँग्रेसचे एकमेव नगरसेवक सईद शेख, भाजपच्या एकमेव नगरसेविका सौ. आरती ठाकूर, माजी नगरसेविका सौ. सुजाता माळी, माजी नगरसेवक अशोक माळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. नागरिकांच्या गर्दीने नारायण उद्यान, लॉयन्स पार्क ओसंडून वाहत होते. उपस्थित नागरिकांच्या बिनधास्त प्रश्‍नांना नगरसेवकांनी आपापल्या परिने उत्तरे दिली.
काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले नगरसेवक भरत राजपूत, रुक्साना मझ्दा, मनोज धांगकर व अनुराधा धोडी आणि अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी नगराध्यक्ष आणि त्यांची दुसरी बाजू असलेले भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेले माजी नगरसेवक रविंद्र फाटक यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवून लोकांशी सामना करणे टाळले. शहा आणि फाटक हे अति महत्वाच्या व्यावसायिक भेटींसाठी डहाणू बाहेर असल्याचे त्यांनी कळवले होते तर रुक्साना यांच्या घरी पाहुणे आलेले असल्याने त्यांनी उपस्थित रहाण्यास असमर्थता व्यक्त केली.
कार्यक्रम ठरल्याप्रमाणे रात्री 8:30 वाजता वेळेत सुरु केला आणि निर्धारित वेळेत रात्री 10:30 वाजता स्थगित करण्यात आला. अनेकांनी वेळेअभावी प्रश्‍न न विचारता आल्याने खंत व्यक्त केली असली तरीही लोकांनी या संकल्पनेचे भरभरून स्वागत केले असून असे कार्यक्रम नियमित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रम किरकोळ चवीपुरत्या चकमकी वगळता अतिशय शिस्तीत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. सरतेशेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत बारी, शिवसेनेचे संजय कांबळे, काँग्रेसचे अशोक माळी, भाजपच्या सुजाता माळी व बहुजन विकास आघाडीचे शशांक पाटील यांनी भविष्यातील योजनांवर भाष्य केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

(गेल्या 10 वर्षांपासून विरोधी पक्षाचे नेते म्हणवून घेणारे भरत राजपूत या सभेला उपस्थित न राहिल्याने विरोधी पक्षाच्या भुमिकेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून कामगिरी पार पाडण्यात ते यशस्वी झालेत असे त्यांना वाटत नसल्याचा संदेश गेला.)

(कार्यक्रमस्थळ हे स्थानिक नगरसेविका सौ. रेणुका राकामुथा व नगरसेवक सईद शेख यांच्या मतदारसंघात असल्याने त्यांच्या प्रभागातील नागरिकांची संख्या अधिक होती. पर्यायाने या लोकप्रतिनिधींना अधिक प्रश्‍नांचा सामना करावा लागला.)

(नगराध्यक्षा सौ. रमिला पाटील यांच्या डोळ्याला दुखापत झालेली असल्याने त्यांनी अनुपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्याही परिस्थितीत त्या वेळेत हजर झाल्या आणि लोकांच्या प्रश्‍नांना सामोर्‍या गेल्या.)

(बहुजन विकास आघाडीचे शशांक पाटील यांनी डहाणू शहराचा विकास कसा असावा याची मांडणी करुन वसई विरार शहराकडे पहा असे म्हणताच लोकांनी, नको…नको असे नारे दिले. यावर तुमच्या पद्धतीचा विकास करा! आम्ही पाठबळ देऊ अशी भूमिका मांडली.)

Print Friendly, PDF & Email

comments