संवेदना हरवलेल्या सीईओ

0
2704

वाड्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 मध्ये काल (5 नोव्हेंबर) अत्यंत गंभीर दुर्घटना घडली. संपूर्ण जिल्हा या घटनेने हेलावून गेला. अनेक पालक भयभीत झाले होते. परंतु इतकी गंभीर घटना असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी तिकडे फिरकल्या सुध्दा नाहीत. यावरून त्यांच्या संवेदनाच हरवल्यात की काय? असा सवाल उपस्थित होतोय.

वाड्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक 2 मधील विद्यार्थी मधल्या सुट्टीत जेवणानंतर मैदानात खेळत होते. त्यावेळी शाळेच्या संरक्षक भिंतीला असलेले गेट कोसळून इयत्ता दुसरीत शिकणार्‍या तन्वी धानवा या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक वैद्यकीय उपचारासाठी ठाणे व मुंबई येथे हलविण्यात आले. या घटनेने संपूर्ण वाडा तालुक्यात शोकमग्न वातावरण होते. भयभीत झालेल्या पालकांनी शाळेकडे धाव घेतली. वाडा पंचायत समितीचं प्रशासनही हादरलं होतं. अशी घटना जिल्ह्यात प्रथमच घडली असावी. तन्वीच्या कुटुंबावर शोककळा पसरली. त्यांच्या दु:खाला पारावार नव्हता. तीचे आईवडील धाय मोकलून रडताना पाहून जमलेल्या जमावाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. अनेकांनी हुंदका आवरण्याचा प्रयत्न केला परंतु ते दु:ख पाहून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ग्रामीण रुग्णालयाचा परिसर शोकाकुल बनला होता. शिक्षकांच्या भवनाही अनावर झाल्या. संपूर्ण तालुका या घटनेने हळहळत होता. तन्वीच्या जाण्याचं दु:ख शब्दात नाही व्यक्त करता येत.

इतकी गंभीर घटना घडली असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरींना घटनास्थळी भेट द्यायला वेळ मिळू नये ही खरंच जिल्ह्यातील जनतेची शोकांतिका म्हणावी लागेल. त्या काल संपूर्ण दिवस मुख्यालयात होत्या. असे असताना तासाभराच्या अंतरावर जायचे त्यांनी टाळावे हे त्यांना विद्यार्थ्यांप्रती किती आस्था आहे हे दर्शवणारे आहे. विद्यार्थ्यांसोबत केवळ भोजन घेऊन फोटोसेशन करून प्रसिद्धी मिळवण्यात या महोदयांना रस. पण गरीब आदिवासी विद्यार्थी शाळेच्या वेळेत मृत्युमुखी पडतात तरी तिकडे फिरकायचे नाही. हे कोणत्या कार्यतत्परतेचे लक्षण आहे.

आपण खूप लोकाभिमुख वैगेरे आहोत हे दर्शविण्यासाठी कॉफी विथ सीईओ सारखे प्रसिद्धीलोलूप उपक्रम राबविण्यात चौधरींना इंटरेस्ट. पण असले उपक्रम राबविण्यापेक्षा सामान्यांच्या प्रश्‍नात आत्मीयतेने लक्ष घातले तर असल्या उपक्रमांची आवश्यकता भासणार नाही. खरं तर ज्या उद्देशाने पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. प्रशासन लोकाभिमुख होऊन लोकांशी अधिक जोडले जाईल ही अपेक्षा. इथल्या आदिवासी जनतेला जिल्ह्याच्या निर्मितीने काही नवी विकासाच्या संधी मिळतील ही जनतेची अपेक्षा भाबडी ठरतेय. चौधरींसारखे अधिकारी जिवन मरणाच्या प्रश्‍नातही आपले अधिकारपदाचे अहंकार जोपासणार असतील तर जिल्ह्यातील जनतेचं काही खरं नाही.

तन्वी तर आज आपल्यात नाही. आज तिच्या कुटुंबियांना भेटून ती परतणार नाही. पण आपण कोणाशी बांधील आहोत हे सिध्द होत असतं. प्रश्‍न भेटण्याचा नाही. तर कमिटमेंटचा आहे. चौधरींची कमिटमेंट नक्कीच तन्वी सारख्या गोरगरीब आदिवासी जनतेशी नाही हेच त्यांच्या कृतीवरून सिध्द होतं. यातुन त्यांची संवेदनहीनताच दिसते एवढं नक्की.

Print Friendly, PDF & Email

comments