डहाणू : बिपीन लोहार यांच्यावर विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

0
2116
BIPIN LOHARदि. ०१: येथील लघु उद्योजक बिपीन लोहार यांच्याविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिपीन यांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर सोडले आहे. २८ सप्टेंबर रोजी दुपारी बिपीन यांच्या फॅक्टरीमध्ये आपल्याला मारहाण झाली असून विनयभंग केल्याचा पिडीत महिलेचा आरोप आहे.
या बाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी बिपीन यांना अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर बिपीन यांनी प्रकृती बिघडल्याचा दावा केल्यानंतर त्यांना डहाणूतील डॉ. अशोक कांबळे यांच्या सिद्धार्थ नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी (२९ सप्टेंबर) न्यायालयासमोर हजर केल्यानंतर बिपीन यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एक रात्र कोठडीमध्ये काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा बिपीन यांनी प्रकृती बिघडल्याची तक्रार केली असता त्यांना डहाणूच्या उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे एक रात्र काढल्यानंतर आज पुन्हा न्यायाधिशांसमोर हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
सीसीटीव्ही फूटेज सादर 
बिपीन लोहार यांनी त्यांच्या कारखान्याबाहेरील सीसीटीव्ही फूटेज पोलीसांना व न्यायालयाला सादर केले असून त्या आधारावर निर्दोष असल्याचा दावा केला. तथापि फिर्यादीने कारखान्याच्या आत विनयभंग केल्याचा दावा केल्याने पोलीस सर्व बाबी तपासून पहात आहेत.
याबाबत डहाणूचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांना विचारले असता फिर्यादी महिलेची फिर्याद घेणे हे पोलीसांचे कर्तव्य होते ते पोलीसांनी पार पाडले. फिर्यादीतील तपशिलाचा खरे खोटे पणा तपासणे हे चौकशीचा भाग आहे. तपासात सत्य बाहेर येईल. समोर जे पुरावे येतील त्याप्रमाणेच कार्यवाही होईल असे सांगितले.
जानेवारी २०१७ मध्ये पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी बिपीन यांच्या कारखान्यात झालेली चोरी शिताफीने उघडकीस आणली होती. यामुळे प्रभावित झालेल्या बिपीन यांनी रोटरी क्लबचे व्यासपीठ वापरून सुदाम शिंदे यांचा जाहीर सत्कार देखील घडवून आणला होता. तेव्हा शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करणारे बिपीन लोहार स्वतःच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसांवर पक्षपातीपणाचा आरोप करताना पाहिल्यावर लोकांची करमणूक होत आहे. बिपीन सत्कार करताना चुकले कि आता आरोप करताना चुकत आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.
Print Friendly, PDF & Email

comments