घिवलीच्या पुनर्वसनाची मागणी

0
1393

राजतंत्र : प्रतिनिधी
पालघर : तारापूर अणुऊर्जा केंद्र तसेच भाभा अणुसंशोधन केंद्राच्या लगत वसलेल्या घिवली गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून या गावाचे पूर्णपणे पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

यापूर्वी दोन्ही राष्ट्रीय अणू ऊर्जा प्रकल्पामुळे गावातील काही भाग स्थलांतरित झाले होते. मात्र यापुढे गावकऱ्यांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही असे आश्वासन प्रकल्प व्यवस्थापनाने दिले होते. प्रत्यक्षात भाभा अणू संशोधन केंद्र टाकत असणाऱ्या कुंपणामुळे गावातील गुरेचरण जमीन, दोन विहिरी आणि शेतीकडे जाणारा मार्ग बंदिस्त होणार आहे. या प्रकरणात अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणीही झाली होती. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थळ पाहणी करण्यासाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी परिसराला भेट दिली.

घिवलीमधील ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून नागरिकांना किरणोत्सर्गाचा त्रास होत असल्याची कैफियत नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर मांडली. घिवली गावाभोवती कुंपण टाकण्यात येत असल्याने गावातील व परिसरातील नागरिकांना मोठय़ा प्रमाणात अडचणी येणार असल्याचे दिसते. त्यामुळेच संपूर्ण गावाचेच पुनर्वसित करण्याची मागणी सर्व संबंधित गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे उपविभागीय अधिकारी हा स्थळ पाहणी अहवाल पाठवणार असल्याचे समजते.

Print Friendly, PDF & Email

comments