राजतंत्र: प्रतिनिधी
पालघर: पश्चिम रेल्वेच्या वाणगाव स्थानकावरून प्रवास करताना एका महिलेचे लोकल ट्रेन मध्ये विसरलेले दोन लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र त्या महिलेला परत देण्यात पालघरच्या रेल्वे पोलिसांना यश आले आहे.
मुळ बोईसर येथे राहणाऱ्या शुंभागीं तामोरे ह्या महिला आपल्या पतीसह अंबरनाथ येथे राहतात. रविवारी(२७ फेब्रुवारी) दोघेही बोईसर येथे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी त्यांनी विरार प्लॅटफॉर्म वरून १वाजून २० मिनिटांची लोकल पकडली.ही लोकल बोईसर स्थानकात आल्या नंतर दोघेही पती-पत्नी स्थानकात उतरून रिक्षा पकडण्यासाठी बाहेर आल्यावर सोन्याचे मंगळसूत्र असलेली बॅग लोकल मध्ये विसरल्याचे लक्षात आले.तो पर्यंत लोकल वाणगाव च्या दिशेने निघून गेल्याने आता आपली दोन लाखाचे मंगळसूत्र गेल्याच्या भावनेने त्या रडू लागल्या. त्यांनी तात्काळ बोईसर स्थानकात कर्तव्यावर असलेल्या मौळे ह्यांची भेट घेत त्यांना सर्व हकीकत सांगितली.त्यांनी तात्काळ वाणगाव पोलीसांशी संपर्क केल्या नंतर पोलीस नाईक माने,शिपाई काकवा,पुरुष-महिला होमगार्ड ह्यांनी लोकल वाणगाव स्थानकात आल्यावर लोकल डब्याची तपासणी करून बॅग मिळवली.दोन्ही पती-पत्नींना वाणगाव रेल्वे स्थानकात बोलावून त्यांना त्याचा ऐवज परत दिल्याने आपले सौभाग्याचे लेणे परत मिळाल्याचा आनंद त्या महिलेच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचे सपोनि पी डी देवकाते ह्यांनी सांगितले.