ड्रग्स माफिया निल्या मोकाट!

0
645

बोईसर शहरात अमली पदार्थ विकणाऱ्या कडे पोलिसांचा कानाडोळा

राजतंत्र: हेमेंद्र पाटील

बोईसर : शहरात अमली पदार्थ विक्री मोठ्या प्रमाणात होत असताना देखील बोईसर पोलिसांना याकडे पाहण्यासाठी वेळच मिळालेला नाही. स्थानिक गुन्हे शाखा असो किंवा बोईसरचे पोलिस यांना सर्वांना माहीत असलेल्या एका माफियांवर दुर्लक्ष का केले जाते हा सवाल उपस्थित राहत आहे. यामुळेच बोईसरची तरूणाई नशेच्या आहारी जात ड्रग्स च्या नशेत उडत असल्याने गुन्हेगारी देखील वाढत चालली असून यावर कारवाई कोण करणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ड्रग्स माफियांना मोकळे रान मिळाले आहे.

बोईसरच्या काटकर पाडा येथील भवानी चौकाच्या बाजूला असलेल्या एका चाळीच्या खोलीतून सुरू झालेला गांजा विक्रिचा गोरखधंदा आता ड्रग्स पर्यंत पोचला आहे. या ठिकाणी असलेली रेल्वेची भिंत आणि त्याठिकाणी लपवून ठेवले जाणारे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात रोजच विक्री केली जात असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण कारोबार चालवणारा निल्या नावाचा म्हणजेच निलेश सुर्वे याला राजकीय पाठबळ देखील आहे. याबाबत काही अधिक तपशील पालघर दर्पण, राजतंत्र आपल्या समोर आणत असून यामध्ये अधिक माहिती अशी की, बोईसर काटकर पाडा भवानी चौक येथे निल्या नावाचा इसम अमली पदार्थ विक्री करत असून त्याच्या सोबत काही महिला देखील या कामात सहभागी असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे बोईसर युनिटला देण्यात आली होती. तसेच काही महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी धाड टाकल्याची माहिती समोर आल्यावर याबाबत पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी याठिकाणी काहीही सापडले नसल्याचे प्रत्यक्षात भेटी दरम्यान सांगितले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने अधिक तपास नेमका काय केला याबाबत अद्यापही उलघडा होऊ शकलेला नाही.

अमली पदार्थ विक्री करणारा निल्या या टोपन नावाने नशा करणारे युवक त्याला ओळखता असून काही मुलींचा देखील या कामामध्ये सहभाग आहे. खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई हुन चार ते पाच मुली निलेश सुर्वेच्या भवानी चौक येथील रूममध्ये येत असल्याची माहिती समोर येत आहे. अतिशय हुशारकीने हा ड्रग्स चा गोरखधंदा चालवला जात असून यामध्ये मोठे रँकेट सहभागी असल्याचे बोलले जात आहे. नशा करणारे ड्रग्स ची मागणी करताना “लंगडी घोडी” या शब्दाचा वापर करतात. यानंतर लहान पुडीत असलेले अमली पदार्थ नशा करणाऱ्यांना दिले जाते. निलेश सुर्वे कडे एक पिस्तूल असल्याचे देखील समोर आले असून याबाबत छायाचित्र देखील उपलब्ध झाले आहे. एकदा नशेत असताना या सुर्वेने पिस्तूल बाहेर काढून फोटो सेशन केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे असल्या गुन्हेगारी इसमावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांन कडून होत असली तरी पोलिसांनी या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलेले दिसत नसल्याने निलेश सुर्वे हा गुन्हेगार मोकाट आहे.

अमली पदार्थांचे सेवन करून एकाची हत्या!
बोईसरमध्ये अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरूणाने रस्त्यावरून चालत असलेल्या नागरिकांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या हल्ल्यात राणी-शिगाव मधील रहिवाशी असलेल्या एकाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी ड्रग्स माफियांवर कारवाई करावी यासाठी बोईसर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी के. एस. हेगाजे यांनी याबाबत कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

  • ड्रग्स माफियांचे एक लाखाचे सुर्वे चषक!
    सरावली ग्रामपंचायत हद्दीत शिवसेनेचे फलक लावून एक लाखाचे पारितोषिक जाहीर करून सुर्वे चषक भरवण्यात आले होते. याठिकाणी सरावली सरपंच, उपसरपंच अशोक साळुंखे व शिवसेना लोकसभा समन्वयक प्रभाकर राऊळ यांचे फोटो या फलकावर असल्याने एकच खळबळ माजली आहे. निलेश सुर्वे करत असलेल्या अमली पदार्थ विक्री बाबत व त्यांने शिवसेनेच्या नेत्यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या नाईट क्रिकेट सामन्यांचे वृत्त समोर आल्यानंतर शिवसेना नेत्यांनी सावरा सावर करत आम्हाला न सांगता आमचे फोटो लावल्याचे स्पष्टीकरण काही समाज माध्यमातून दिले आहे.

सुर्वेचे आर्थिक व्यवहार चालतात दुसऱ्याच्या नावाने!
अमली पदार्थ विक्री मधुन येणारे लाखो रूपये व त्याचे मोठे अर्थकारण हे इतर लोकांच्या बँक खात्यातून करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. विशेष म्हणजे निलेश सुर्वे वापत असलेली सुझुकी कार ही मुकेश राँय नावाच्या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर आहे. अनेक फोटो मध्ये या कारचे फोटो असून आता या गोरखधद्यात नेमकी कोण माया व कोण राँय याचा शोध बोईसर पोलिसांनी घेणे गरजेचे आहे. तसेच अशा अमली पदार्थाचे माफिया राज चालवणाऱ्या इसमाच्या संपर्कात राजकीय असो किंवा पोलिस या सर्वांचे भ्रमणध्वनी संपर्क गेल्या अनेक वर्षांचे तपासणी केल्यास बोईसर मधील मोठे घबाड बाहेर येण्याची शकता आहे.

Print Friendly, PDF & Email

comments