बोईसर, दि. 16 : भरधाव वेगात असलेल्या एका पिकअप टेम्पाने रस्त्याच्या कडेला उभ्या 3 ते 4 वाहनांना चिरडल्याची घटना बोईसर-पालघर रस्त्यावरील खैराफाटक भागात घडली आहे. या अनियंत्रित झालेल्या टेम्पोची विद्युत खांबाला धडक बसल्याने व एका रिक्षाला सुमारे 8 ते 10 फुट फरफटत नेल्यानंतर टेम्पोचा वेग कमी झाला व बाजूच्याच ऑटो गॅरेजला धडकून टेम्पो थांबला. सुदैवाने अपघाताची चाहूल लागल्याने तेथे उपस्थित लोक सतर्क झाले व मोठी जीवितहानी टळली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात घडला. एम.एच.04/जे.के.0903 या क्रमांकाचा एक पिकअप टेम्पो पालरघहून बोईसरच्या दिशेने येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याने गाडी थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला नेली. यावेळी विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला दोन मोटारसायकली, एक रिक्षा व एक भंगार म्हणून ठेवलेली मोटारसायकल उभी होती. टेम्पोने आधी तीन मोटारसायकलींना चिरडत जुन्या विद्यूत खांबाला धडक दिली. यानंतर समोर आलेल्या एका रिक्षाला सुमारे 8 ते 10 फुट फरफटत नेत ऑटो गॅरेजला धडक दिली. विद्यूत खांबाला धडक दिल्याने व रिक्षाला फरफटत नेल्याने टेम्पाचे वेग कमी झाला व टेम्पो थांबला. अन्यथा टेम्पो गॅरेजमध्ये घुसला असता. येथे काही इसम कामही करत होते. तर काहीजण उभे होते. मात्र अपघाताची चाहूल लागल्याने सर्व सतर्क झाले व मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे टेम्पो दुभाजक ओलांडत असताना कोणतेही वाहन विरुद्ध दिशेने येत नव्हते. अन्यथा भीषण अपघात होण्याची शक्यता होती. टेम्पोचा चालक सुखरुप असुन स्टेअरींग फेल झाल्याने आपले गाडीवरील नियंत्रण सुटले, असा दावा त्याने केला आहे. मात्र अपघाताच्या चौकशीनंतरच यामागचे खरे कारण समोर येणार आहे.