विक्रमगड नगरपंचायतीवर जिजाऊचे वर्चस्व; निलेश सांबरे यांचा सर्व पक्षांना धोबीपछाड

0
398

राजतंत्र : सचिन भोईर

विक्रमगड: विक्रमगड नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून जिजाऊ व श्रमजीवी पुरस्कृत विक्रमगड विकास आघाडीला 16 जागी घवघवीत यश मिळाले असून सेनेचा 1 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी, भाजपा व काँग्रेसचे अक्षरशः पानिपत झाले आहे.

विक्रमगड नगरपंचायतीच्या 17 जागी 21 डिसेंबरला मतदान झाले होते ज्यात विक्रमगड विकास आघाडीचे 3 जागी बिनविरोध उमेदवार निवडून आले होते. बुधवारी झालेल्या मतमोजणीत विक्रमगड विकास आघाडीने जोरदार मुसंडी मारीत एकहाती सत्ता आपल्या ताब्यात घेतल्याचे चित्र समोर आले आहे.

विक्रमगडमध्ये प्रभाग 1 मध्ये सेनेच्या सोनल सुरेश गवते यांचा विजय झाल्या, प्रभाग 2 मध्ये मनोज विलास वाघ विजयी, प्रभाग 3 मध्ये चंद्रशीला अमोल भडांगे विजयी झाल्या, प्रभाग 4 मध्ये विद्यमान उपनगराध्यक्ष निलेश रमेश पडवळे विजयी झाले, प्रभाग 5 मध्ये ज्योत्स्ना योगेश माडी विजयी झाले, प्रभाग 6 मध्ये जयश्री पांडुरंग महाला विजयी झाले. प्रभाग 8 मध्ये भारती रमेश बांडे विजयी झाल्या असून ऐनवेळी भाजपामध्ये गेलेल्या विद्यमान नगराध्यक्षा प्रतिभा पडवळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

प्रभाग 9 मध्ये माधुरी विष्णू सांबर यांचा विजय झाला असून प्रभाग 10 मध्ये वैशाली गणेश तामोरे विजयी झाल्या, प्रभाग 12 मध्ये विजय विठ्ठल मेघवाली तर प्रभाग 13 मध्ये अर्चना श्याम लोहार विजयी झाल्या, प्रभाग 15 मध्ये अमित जाण्या भावर विजयी झाले असून प्रभाग 16 मध्ये महेंद्र तुकाराम पाटील विजयी झाले आहेत. प्रभाग 17 मध्ये निमा अंकुश महाला विजयी झाल्या आहेत. प्रभाग 7 मध्ये पुष्पा डंबाली ,11 प्रभागात अमोल भडांगे तर प्रभाग 14 मध्ये कीर्ती कनोजा आधीच बिनविरोध विजयी झाले होते.

जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या विक्रमगड विकास आघाडीच्या विरोधात विक्रमगड नगर पंचायतीच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची तयारी दाखवली होती. मात्र कोणत्याच राजकीय पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याने शेवटी एक -दोघां पक्षांनी एकत्र घेत युती केल्या होत्या. मात्र विक्रमगडच्या मतदारांनी निलेश सांबरे आणि निलेश(पिंका) पडवळे यांना स्विकारत इतर पक्षांचे मात्र पानिपत केले आहे.

पालघर जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष असलेले तसेच राष्ट्रवादीचे विक्रमगड तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर (शिवा ) सांबरे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने काहीसा अविश्वास दाखविल्याचा फटका विक्रमगड नगरपंचायतीमध्ये बसला असून यामुळेच राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदार संघातील विक्रमगड नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नसल्याचे बोललेले जात आहे.

आम्ही विक्रमगड नगर पंचायतीमध्ये केलेल्या विकास कामांमुळे येथील मतदारांनी सर्व पक्षांना नाकारलेले असून आमच्यावर पुन्हा पूर्णपणे विश्वास दाखविला आहे. आम्ही भविष्यात विक्रमगड नगरपंचायत ही राज्याला हेवा वाटावा अशी बनविण्याचा आमचा मानस आहे. – निलेश(पिंका) पडवळे, विद्यमान उपनगराध्यक्ष-विक्रमगड

Print Friendly, PDF & Email

comments