पालघर नगरपरिषदेत बेकायदा जाहिरात फलकांचा सुळसुळाट

0
1785

नगरपरिषदेच्या नगरसेवकांसह प्रशासनाचा कानाडोळा

राजतंत्र/प्रतिनिधी :

पालघर : पालघर नगरपरिषद क्षेत्र सध्या जाहिरात फलकांच्या विळख्यात सापडले आहे. नगर परिषदेमार्फत वार्षिक जाहिरात ठेका देण्यात आला असला तरी परवानगी न घेता अनेक व्यवसायिकांमार्फत राजरोस जाहिरात फलक लावले जात आहेत. त्यामुळे शहर विद्रुपीकरणासह नगरपरिषदेला मोठे नुकसान होत आहे.

शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये या जाहिरातींचा विळखा दिसत असताना नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागासह त्या त्या प्रभागातील नगरसेवक या बाबींकडे कानाडोळा करत आहेत. अशा बेकायदा फलक बाजीवर कारवाई होत नसल्याने बेकायदा जाहिरातबाजीचे पेव फुटले आहे व ते वाढतच जात आहे. अनेक गृहसंकुले, इमारत विकासक, विविध खाजगी योजना असलेले दुकानांचे फलक, खाजगी शाळा, बालवाड्या यांसह राजकीय पक्षांचे व इतर जाहिरात फलक मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये बेकायदा पद्धतीने झळकताना दिसत आहेत. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी हे फलक लावण्यात आले असले तरी त्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा बेकायदा फलकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची मागणी पुढे येत आहे.

शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला असलेले वीज खांब, शहरातील झाडे याला तारा व सर्रास खिळे ठोकून फलक लावले जातात. यामुळे झाडांचीही मोठी हानी होत आहे.तसेच वेळप्रसंगी महावितरणच्या विजतांत्रीना दुरुस्तीसाठी खांबावर चढण्यास हे फलक अडथळा ठरत आहेत. अनेक वळणाच्या रस्त्यावर फलक लावल्याने समोरील येणारे वाहन दिसत नाही. अशावेळी अपघाताची शक्यता आहे. बेकायदा फलकांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याचे सध्या फलकांच्या सुळसुळटावरून अधोरेखित होत आहे.

पालघर शहरातील सोनोपंत दांडेकर मार्ग, नवनीत भाई शहा मार्ग, कचेरी रस्ता, टेंभोडे-पालघर रस्ता, देवी सहाय रस्ता, माहीम-मनोर हायवे या मुख्य रस्त्याशिवाय अनेक अंतर्गत रस्ते,गल्ली बोळातील परिसरही जाहिरातदारांनी सोडलेले नाहीत. तर काही खाजगी कार्यालयांनी आपल्या नावाचे व पत्त्यांचे लोखंडाचे कायमस्वरूपी फलक रस्त्यात,रस्त्याच्या कडेला कोणतीही परवानगी न घेता उभारले आहेत. अनेक वेळा बेकायदा फलकांचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला असताना नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. यावरून नगरपरिषद प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments