मुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा अजूनही अनिश्चित!

0
1890
  • जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटनासाठी दौरा जाहीर न झाल्यामुळे संभ्रम कायम!
  • मुख्यालयाचे लोकार्पण प्रत्यक्षात की आभासी होणार?

राजतंत्र/हेमेंद्र पाटील :
पालघर : येत्या 19 ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येणार अशी चर्चा व त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असली तरी मुख्यमंत्री दौर्‍याचा कार्यक्रम जाहीर न झाल्यामुळे मुख्यमंत्री प्रत्यक्षात पालघरला येतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवघे दोन दिवस शिल्लक असताना व शिवसेनेकडून फलकबाजी झाली असताना दौरा कार्यक्रम जाहीर झाला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

7 वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेले पालघर जिल्हा मुख्यालय आता तयार झाले असून त्याच्या उद्घाटनाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत होती. अखेर मुख्यमंत्री 19 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यात दाखल होऊन जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन करतील अशी ठोस माहिती पालघर जिल्हाधिकारी यांनी काहींच्या कानात सांगितल्यानंतर हे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. प्रत्यक्षात अवघे दोन दिवस बाकी असताना अजूनही मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा मुख्यमंत्री कार्यालयातून जाहीर न झाल्यामुळे या उद्घाटनाबाबतीत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.

मुख्यमंत्री पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असल्याने अलीकडे दादा भुसे यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा करून विविध प्रशासकीय यंत्रणांसोबत या उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची बैठक घेऊन विभागनिहाय आढावा घेतला. त्यानंतर मंत्रालयीन पातळीवरूनही अनेक उलट तपासण्या करण्यात आल्या. ही तयारी पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर जिल्ह्यात येणार हे निश्चित झाले होते. त्या दृष्टीने त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी बोईसरच्या विराज प्रोफाइल हेलिपॅड येथून येणारा पालघर-बोईसर रस्ता चकाचक करण्यात आला आहे. याच बरोबरीने जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मांडव उभारणीचे काम जोमात सुरु आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रवेशपत्रांबाबत जिल्हा माहिती कार्यालयाकडून माहिती घेण्यात येत आहे. अशी सर्व जय्यत तयारी सुरू असताना दोन दिवस येऊन ठेपलेली असताना मुख्यमंत्र्यांचा दौरा मंगळवारी 17 आगस्ट रोजी रात्री पर्यंत जाहीर न झाल्याने दौर्‍याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाला दौर्‍याबाबत विचारले असता अजूनही अधिकृतपणे दौरा कार्यक्रम आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री येणारच अशी भावना शिवसैनिकांमध्ये असली तरी ते येतील की नाही याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये साशंकता दिसून येत आहे. 19 ऑगस्ट ही जिल्हा मुख्यालय लोकार्पणाची तारीख अजूनही अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय उद्घाटनासाठी सुसज्ज असली तरी मुख्यमंत्र्यांचा दौरा अधिकृतरित्या आला नसल्याने मुख्यमंत्री हे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने कि प्रत्यक्षात येऊन करतील याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments