पालघर, दि. 20 : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैदेही वाढाण, तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज, मंगळवारी ही निवडणूक पार पडली. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना आमदार रवींद्र फाटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा, माजी उपाध्यक्ष नीलेश सांबरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड आदी उपस्थित होते.
पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असून पक्षांतर्गत ठरलेल्या धोरणानुसार सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने 7 जुलै रोजी भारती कामडी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर अतिरिक्त ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फटका बसल्याने उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. दरम्यान, अध्यक्ष पदासाठी सुरेखा थेतले व वैदेही वाढाण यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर सांबरे व महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. परंतु सुरेखा थेतले व महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाली.