तुम्हाला 30 युनिटपर्यंत बील येतयं? तर पडताळणीला तयार रहा!

पालघर ग्रामीणमधील 1.3 लाख ग्राहक महावितरणच्या रडारवर!

0
1154

कल्याण, दि. 16 जुलै 2021 : महावितरणच्या कल्याण परिमंडळात दरमहा 30 युनिटपेक्षा कमी वीज वापर असणार्‍या ग्राहकांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. परिमंडळात तब्बल 20 टक्के ग्राहकांचा वीजवापर 30 युनिटपेक्षा कमी असून या सर्व ग्राहकांच्या वीज वापराची पडताळणी करण्यात येणार आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करून महसूल वाढीच्या उद्देशाने 30 जुलैपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या कल्याण परिमंडळातर्फे प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आली आहे.

मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, 30 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍या परिमंडलातील 3 हजार ग्राहकांची नुकतीच पडताळणी करण्यात आली. यात बहुतांश ठिकाणी नादुरुस्त किंवा बंद वीजमीटर, मीटरचे सील तुटणे, मीटर घराच्या आत असणे, मीटरशी छेडछाड किंवा वीजचोरी, वीज भारात बदल, चुकीचे रिडींग आदी बाबींमुळे वीजवापर कमी असल्याचे आढळून आले. परिणामी होणारे नुकसान टाळण्यासाठी 30 युनिटपर्यंत वीज वापर असणार्‍या सर्वच 4 लाख 44 हजार 238 ग्राहकांची पडताळणी करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवलीचा समावेश असणार्‍या कल्याण मंडळ कार्यालय एक अंतर्गत 80 हजार 849, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग व उल्हासनगरचा समावेश असलेल्या कल्याण मंडळ कार्यालय दोन अंतर्गत 1 लाख 3 हजार 435, वसई व विरार समाविष्ट असणार्‍या वसई मंडळ कार्यालयांतर्गत सर्वाधिक 1 लाख 56 हजार 661 आणि पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या (वसई व विरार वगळून) पालघर मंडळात 1 लाख 3 हजार 293 ग्राहकांचा दर महिन्याचा वीज वापर 30 युनिटपेक्षा कमी आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरु असून तपासणीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विभाग व उपविभागीय स्तरावर विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून मोहिमेच्या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. या मोहिमेत कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी परिमंडळातील ग्राहकांना केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments