दिलासादायक: पालघर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर 5% पेक्षा कमी; निर्बंध मात्र जैसे थे कायम! पालघर व बोईसर शहरासाठी निर्बंध वाढले!

0
1737

पालघर, दि. 10 जुलै: पालघर जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी असून जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर 4.9% इतका खाली आला आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने, जिल्ह्यात लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून पालघर तालुक्याचा आकडा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याने पालघर नगरपालिका क्षेत्र व बोईसर औद्योगिक क्षेत्रासाठी अधिकचे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

9 जुलैच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 1 हजार 715 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यातील सर्वाधिक 1 हजार 83 रुग्ण एकट्या वसई तालुक्यातील (1 हजार 15 रुग्ण वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील व 68 रुग्ण वसई ग्रामीण क्षेत्रातील) आहेत. त्या खालोखाल पालघर तालुक्यात 346 व वाडा तालुक्यात 136 रुग्ण असून डहाणू व विक्रमगड तालुक्यात अनुक्रमे 98 व 44 रुग्ण आहेत. तलासरी व जव्हार तालुक्यात अत्यल्प असे 5 व 3 रुग्ण असून मोखाडा तालुक्याचा आकडा 0 आहे.

जिल्ह्याने कोरोनाच्या आजारातून 2 हजार 627 जणांना गमावले आहेत. त्यातील वसई तालुक्याने निम्म्यापेक्षा जास्त 1 हजार 598 मृत्यू नोंदवले आहेत तर त्या खालोखाल पालघर तालुक्याने 504 व डहाणू तालुक्याने 190 जणांना गमावले आहे. जव्हार तालुक्यात 66, तलासरी व विक्रमगड तालुक्यात प्रत्येकी 49 आणि मोखाडा तालुक्यात 43 जणांचा मृत्यू झाला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments