डहाणू, दि. 5 : एका 19 वर्षीय तरुणाने शेजारी राहणार्या महिलेसोबत झालेल्या किरकोळ वादातून तिच्यावर धारधार हत्याराने हल्ला करत निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आगर भागात घडली आहे. डहाणू पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असुन त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षला राजेश करबट असे खून झालेल्या महिलेचे नाव असुन सुरज सचिन पटेल असे आरोपी तरुणाचे नाव आहे. आगरमधील वावरपाडा गावात एकमेकांच्या शेजारी रहावयास असलेले हर्षला करबट व सचिन पटेल यांच्यामध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन वाद होत होते. काल, रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास देखील अशाचप्रकारे दोघांमध्ये वाद झाला. यामुळे संतापलेल्या सुरजने रात्री 12 वाजेच्या सुमारास हर्षला करबट यांच्या घरात शिरुन धारधार चाकूने त्यांच्या पोटात आणि छातीवर अनेकवेळा वार केले. या हल्ल्यात हर्षला करबट यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर डहाणू पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी तरुणालाही तात्काळ अटक करण्यात आली असुन त्याच्यावर डहाणू पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
डहाणू पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल गवळी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.