रेती माफियांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; रेतीसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
531

पालघर, दि. 24 : तालुक्यातील केळवे सागरी पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्‍या वैतरणा रेल्वे ब्रिज क्र. 92 व 93 च्या परिसरात तसेच चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या वाढीव वैतीपाडा गावच्या किनार्‍यावरुन अवैधरित्या रेती उत्खनन करुन रेल्वे ब्रिज व वाढीव वैतीपाडा गावाला धोका निर्माण करणार्‍या रेतीमाफियांविरोधात पालघर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 20 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच संबंधितांवर केळवा व सफाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.

वैतरणा ब्रीज क्र. 92 व 93 च्या परिसरात तसेच वाढीव वैतीपाडा गावच्या किनार्‍यावर अवैधरित्या रेती उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्याने, यामुळे रेल्वे ब्रिज व वाढीव वैतीपाडा गावाला भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालघर पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी याबाबत प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सुचना संबंधित पोलीस स्टेशन व महसुल विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार, पालघरचे तहसीलदार तथा दंडाधिकारी सुनिल शिंदे व केळवा सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भीमसेन गायकवाड यांनी काल, 23 जून रोजी वाढीव-वैतीपाडा गावात ठिकठिकाणी वेषांतर केलेले पोलीस कर्मचारी व पोलीस मित्रांना मार्गदर्शन करुन अवैधरित्या रेतीउत्खनन करणार्‍या रेतीमाफियांवर कारवाईसाठी पाठवले.

यावेळी पोलिसांच्या पथकाला तीन बोटींद्वारे रेतीउत्खनन केले जात असल्याचे निर्दशनास आल्यानंतर त्यांना थांबण्याचा इशारा देण्यात आला. मात्र बोटीवरील सर्व आरोपींनी बोटी किनार्‍यांवर लावून झाडाझूडपांचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर पोलिसांनी सदर बोटी जप्त करत सफाळे पोलीस स्टेशन हद्दीतील दारशेतपाडा व सोनावे भागातही पाहणी केली असता येथे एक सक्शन पंप व दोन रेतीने भरलेल्या बोटी आढळून आल्या. अशाप्रकारे एकुण 20 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे. तसेच संबंधितांवर केळवे तसेच सफाळे पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments