ई-गृहप्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालघरमधील लाभार्थ्यांना चावींचे वितरण

0
825

पालघर, दि. 16 : ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानाअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळालेल्या 3 लाख 23 हजार लाभार्थ्यांनी आज गृहप्रवेश केला. त्याचबरोबर या अभियानाअंतर्गत सुमारे 4 लाख 68 हजार घरकुलांची बांधकामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून ती महिन्याभरात पूर्ण होऊ शकतील. अशा पद्धतीने या अभियानातून कमी कालावधीत सुमारे आठ लाख कुटुंबांना घरकुलाचा लाभ देऊन ग्रामविकास विभागाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

सह्याद्री अतिथृगृह येथे काल, 15 जून रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या. यात वाड्यामधील एक व तलासरीतील दोन लाभार्थ्यांचा समावेश आहे.

पालघर तालुक्यातील तीन लाभार्थ्यांना चावींचे वाटप

तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या दालनात जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, समाजकल्याण समिती सभापती विष्णू कडव यांच्या हस्ते व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात पालघर तालुक्यातील तीन लाभार्थ्यांना चावींचे वाटप करण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजनेत 25 हजार 689 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून 25 हजार 665 म्हणजेच 99.91% घरे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 25 हजार 551 लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला असून 22 हजार 774 घरे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. तर राज्य पुरस्कृत योजनांमध्ये 6 हजार 366 उद्दिष्टांपैकी 6 हजार 343 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली असून 6 हजार 285 लाभार्थ्यांना पहिला हप्ता देऊन कामाला सुरुवात करून 4 हजार 798 घरे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती यावेळी प्रकल्प संचाल माणिक दिवे यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्राम पंचायत स्तरावर हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email

comments