जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील बंदी मागे; मात्र ‘हे’ नियम मोडल्यास दाखल होणार गुन्हा!

जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले सुधारित आदेश!

0
1767
केळवे बीच

पालघर, दि. 11 : पावसाळ्यादरम्यान पर्यटनस्थळांवर होणार्‍या दुर्घटना तसेच अशा ठिकाणी सामाजिक अंतर न पाळल्यास करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्यात आली आहे. पालघर जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी काही प्रतिबंधात्मक नियमांसह पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालघर अपर जिल्हादंडाधिकार्‍यांनी 10 जून रोजी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर बंदीचा आदेश पारित केला होता. पालघर जिल्ह्यात मान्सून कालावधीत मोठ्या संख्यने पर्यटक धबधबे, तलाव, धरणे व समुद्र किनारी येत असतात. मात्र यावेळी एखादी अप्रिय घटना घडून जीवितहानी होत असते. तसेच सध्यस्थितीत जिल्ह्यात कोव्हीड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्यास सामाजिक अंतर राखणे शक्य होणार नाही. परिणामी कोव्हीड-19 चा प्रसार व प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

आता पालघर जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे नविन आदेश काढले असुन पालघर जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने बंदीबाबतच्या निर्णयाबाबत आपले मतपरिवर्तन झाल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार पर्यटनस्थळे आता सर्वांसाठी खुली झाली असुन पर्यटकांना खालील प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

  • पावसामुळे प्रवाह वाढलेल्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
  • धबधब्याच्या उगम स्थानी जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
  • पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दर्‍यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.
  • पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.
  • वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे.
  • वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतूकीस अडथला होईल अशा प्रकारे वाहने चालविणे.
  • बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
  • सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लास्टीकचे साहित्य उघड्यावर फेकणे.
  • सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
  • सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा बाजवणे, डि.जे. सिस्टीम वाजवणे, गाड्यांमधील स्पिकर/उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.
  • ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.

दरम्यान, वरील आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 591 (ब) नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments