राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; मंत्री वड्डेटीवारांच्या अनलॉकच्या घोषणेवर सरकारचे स्पष्टीकरण

0
1147

मुंबई, दि. 3 : राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिल्यानंतर काहीवेळातच राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले असुन राज्यातील निर्बंध असुन हटविण्यात आलेले नाहीत. तसेच नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे, ते शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments