पालघर, दि. 29 : कोकण किनारपट्टीला नुकताच तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. यावेळी खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या अनेक बोटी व जहाजांचे नुकसान झाले आहे. अशाचप्रकारे एक जहाज (तराफा) वडराई हद्दीतील समुद्रात अडकले आहे. गंभीर बाब म्हणजे या जहाजातून डिजेलची गळती होत असल्याने मासेमारीवर याचा परिणाम होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तौत्के चक्रीवादळाच्या काही तासांअगादेरच एक जहाज अलिगाबवरुन निघाले होते. हे जहाज सुमारे 350 किलोमीटरच्या प्रवासानंतर 18 मे रोजी पालघर जिल्हा हद्दीतील वडराई येथील समुद्रात असतानाच तौक्ते चक्रवादळात अडकले. हा भाग अत्यंत खडकाळ असल्याने खडकांवर आदळून जहाजाला अपघात झाला व तेव्हापासुनच हे जहाज सदर ठिकाणी अडकून पडले आहे. अपघातानंतर या जहाजातून 137 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तसेच जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. जहाजाचे अनेक तुकडे समुद्रात तरंगताना दिसुन येत आहेत. तर गंभीर बाब म्हणजे या जहाजात सुमारे 80 हजार लिटर डिझेल व काही प्रमाणात ऑईल असल्याची व त्याची गळती होत असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली आहे. डिझेलगळतीमुळे तेलाचे तवंग निर्माण होत असल्याने मासेमारीवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे जहाज हटवण्याची मागणी मच्छीमारांकडून होत आहे.