राज्यात 1 जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार!

रुग्णसंख्या कमी होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये मात्र काही निर्बंध शिथिल होणार!

0
2062
संग्रहित छायाचित्र

मुंबई, दि. 27 : राज्य मंत्रिमंडळाच्या आज, गुरुवारी पार पडलेल्या बैठकीतनंतर राज्यात 1 जूनपर्यंत लागू करण्यात आलेला लॉकडाऊन त्यापुढेही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या कमी होत आहे, अशा जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी लॉकडाऊनबाबत झालेल्या चर्चेची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये करोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट अजूनही 10 टक्क्यांवर आहे. त्यामुळे सध्या जे निर्बंध आहेत ते सरसकट उठवले जाणार नाहीत. 1 जूननंतरही हे निर्बंध कायम ठेवले जातील. तर ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, अशा जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात येतील. दरम्यान, येत्या दोन दिवसांमध्ये लॉकडाऊनसंदर्भातली नवी नियमावली जाहीर केली जाणार असल्याने रुग्णसंख्या कमी होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये नेमके कोणते निर्बंध शिथिल होतील, हे स्पष्ट होणार आहे.

राज्यात करोनाची लाट ओसरत असली तरी, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असुन 21 जिल्ह्यांत करोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. त्यामुळे लॉकडाऊन सरसकट उठवता येणार नाही. रुग्णसंख्या वाढती असेल तर त्यासोबत बेड उपलब्धतेसह इतरही प्रश्न निर्माण होत असतात. त्यामुळे त्याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील. म्हणून लॉकडाऊन कायम ठेवून काही प्रमाणात शिथीलता देण्याचा विचार आहे. जिथे रुग्णसंख्या कमी होत आहे तिथे काही निर्बंध शिथील केले जातील. सध्या जे निर्बंध लागू आहेत त्यात वेळेच्या बाबतीत तसेच अन्य बाबतीत काही सवलती देता येतील का यावर विचारविनिमय करून निर्णय होईल. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही टोपे यांनी नमूद केले.

Print Friendly, PDF & Email

comments