बुवाबाजी सुरु असलेल्या घरावर पोलिसांची धाड; भगत व घरमालकाला घेतले ताब्यात

27 लोकांना ठोठावला आर्थिक दंड; विक्रमगड येथील घटना!

0
1511

विक्रमगड, दि. 14 : राज्यभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना विक्रमगडसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात अंधश्रेद्धेतून गर्दी जमल्याचे समोर आले आहे. याबाबत खबर लागताच विक्रमगडच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी आपल्या पथकासह संबंधित घरावर छापा टाकून विनामास्क असणार्‍या 27 जणांकडून आर्थिक दंड वसुल केला. तर बुवाबाजी करणारा भगत व घरमालक अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विक्रमगड उपविभागीय अधिकारी यांना आज 14 मे रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास विक्रमगडमधील सातकोर येथील रहिवासी बंदु तारानाथ वरठा यांच्या घरी बुवाबाजी सुरु असल्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सदर घरावर धाड टाकली असता विक्रमगडसह भिवंडी, मनोर, सफाळे, वाडा व मुरबाड अशा विविध तालुक्यातील जवळपास 40 ते 50 लोक एकत्र जमून एका भगताच्या साक्ष बुवाबाजी करीत असल्याचे आढळून आले. पथकाने धाड टाकताच काही लोक तेथून पळून गेले. तर भगत समवेत 27 लोकांना पकडण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व लोक विनामास्क गर्दी करुन एकत्रित आल्याने सर्वांकडून 500 रुपये प्रमाणे एकूण 12 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सर्वांची अँटीजेन टेस्ट देखील करण्यात आली व सर्व अहवाल निगेटीव्ह देखील आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी घर मालक व भगत अशा दोघांना ताब्यात घेतले असून दोघांवर विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments