करोना ‘पॉझिटिव्ह’ बातमी : दैनंदिन रुग्णांचा आलेख येतोय खाली

0
1900

पालघर, दि. 5 : पालघर (ग्रामीण) जिल्ह्यातील मागील काही दिवसांतील करोना रुग्णांची आकडेवारी कमी होत असुन, विशेष म्हणजे करोना हॉटस्पॉट ठरलेल्या पालघर तालुक्यातील दैनंदिन रुग्णांचा आकडाही दिलासादायक आहे. पालघरमधील 450 ते 500 पर्यंत उंचावलेला रुग्णांचा आलेख मागील तीन दिवसांपासुन 300 वर आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासह नागरीकांनी काही प्रमाणात तरी सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे. असे असले तरी नागरीकांनी करोनाचे नियम पाळून काळजी घेण्याचे आवाहन वारंवार प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज 5 मे रोजी जिल्ह्यात (ग्रामीण) 511 रुग्णांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर काल 4 मे रोजी 430 व 3 मे रोजी 441 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिल्ह्यातील करोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या पालघर तालुक्यातील दैनंदिन करोना रुग्णांची संख्या 150 ते 200 ने खाली आल्याचे पाहायला मिळत आहे. आज पालघरमध्ये 306, 4 मे रोजी 312 व 3 मे रोजी 306 नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात, 28 एप्रिल रोजी पालघर तालुक्यातील हाच आकडा 537 पर्यंत पोहोचला होता. पालघर व्यतिरिक्त मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असलेल्या डहाणू व जव्हार तालुक्यातील मागील काही दिवसांची आकडेवारी देखील दिलासादायक असुन येथील दैनंदिन रुग्णसंख्येतही चांगली घट झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील करोनाचा आलेख खाली येत असला तरी नागरीकांनी करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी करोनासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना करोना चाचणीबाबत मार्गदर्शन करुन प्रशासनाला या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments