डहाणू, दि. 3 : डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्या आकस्मित मृत्यूनंतर नगरपरिषदेचा तात्पुरता कारभार डहाणू तहसिलदारांकडे सोपवण्यात आला आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने नागरीकांना आरोग्य तसेच इतर सुविधा पुरविण्यात अडचणी येत असल्याने नगरपरिषदेला स्वतंत्र पदभार असलेले मुख्याधिकारी द्या, अशी मागणी डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.
आमदार निकोलेंनी आपल्या निवदेनात म्हटले आहे की, डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे गेल्या महिन्यात आकस्मित निधन झाल्यामुळे त्यांचा पदभार तलासरी मुख्याधिकार्यांकडे सोपविण्यात आला होता. मात्र तलासरी ते डहाणू साधारण अंतर हे 45 ते 50 किमी असल्यामुळे कामकाजात गैरसोय होत होती. हे पाहता नगर परिषदेचा कारभार डहाणू तहसीलदारांकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, डहाणू हे शहर आहे. या शहरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत असून नागरिकांच्या समस्या सुद्धा वाढत आहेत. त्याचबरोबर सध्या करोनाचा प्रादुर्भाव डहाणूमध्ये पसरत आहे. अशात पुर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने शहरात आरोग्य सुविधांबरोबरच सांडपाण्याची व्यवस्था करणे, जन्ममृत्युची नोंद ठेवणे, आरोग्यविषयक इतर सेवा उपलब्ध करून देणे अडचणीचे ठरत आहे. अशाप्रकारच्या अनेक तक्रारी देखील गेल्या महिन्याभरापासून आपल्याकडे येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन डहाणू नगर परिषदेला स्वतंत्र पदभार आलेले मुख्याधिकारी असणे करोना काळात अत्यंत आवश्यक झाले आहे. जेणेकरून करोना संदर्भात उपयोजना करण्यास सोयीचे होईल. त्यामुळे तात्काळ नगरपरिषदेला पुर्ण वेळ मुख्याधिकारी राज्य सरकारकडून देण्यात यावा, अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी मंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत गोरखना, डहाणू शहर सचिव कॉ. धनेश अक्रे, कॉ. रशीद पेंटर, कॉ. महेंद्र दवणे, डॉ. आदित्य अहिरे आदी उपस्थित होते.