अडाणीच्या भरोशा वर डहाणूचा ऑक्सिजन प्रकल्प रखडला

0
2800

दि. 1 मे 2021: कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजन बेड्सची मुबलक व्यवस्था उपलब्ध व्हावी व ऑक्सिजन अपुरा पडू नये याकरिता सरकारच्या निर्देशानुसार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 1 कोटी 6 लक्ष 63 हजार रुपयांच्या कामास 22 एप्रिल 2021 रोजी (जा. क्र. जिनिस/ O/2021/Apr/ AAO/00013) प्रशासकीय मंजुरी दिली होती. लगेचच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पालघर विभागातर्फे 23 एप्रिल 2021 रोजी एच. पी. मेघपुरीया यांना पहिल्या टप्प्याचे मध्यवर्ती ऑक्सिजन व्यवस्था निर्माण करण्याच्या कामाचे कार्यादेश (जा. क्र./ सा. बां./निविदा/ कोविड 29/ 2196) देण्यात आले असून काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली होती. 3 मे पर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र अजून काम सुरु देखील झालेले नाही.

अडाणीच्या आशेवर रखडले काम

डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयाला अडाणी उद्योग समुहाच्या डहाणू औष्णिक विज प्रकल्पाकडून सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वतः नियोजित केलेल्या कामाकडे पाठ फिरवली आहे. प्रत्यक्षात अडाणी समुहाच्या प्रतिनिधीकडे याबाबत चौकशी केली असता असा कुठलाही ठोस निर्णय अजून झालेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकांमध्ये तीव्र नाराजी! जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी!

जिल्हा प्रशासनाने निधी मंजूर असतानाही अडाणी किंवा अंबानींकडून ऑक्सिजन मिळणार असेल तर तो घ्यावा, आणि वेळेत प्रकल्प उभा करावा. टाईमपास करुन लोकांच्या जिवाशी खेळू नये! अडाणींच्या आशेवर लोकांचे जीव घालवू नयेत अशी संतप्त प्रतिक्रिया डहाणूकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments