पालघर जिल्ह्यासाठी दोन बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेत; आणखी 23 उपलब्ध होणार!

दुर्गम भागातील गरोदर मातांसह करोना रुग्णांसाठीही येणार उपयोगात; अलर्ट सिटीझन फोरम व एसबीआयचा 'प्रोजेक्ट आरोग्यम' उपक्रम

0
491

पालघर, दि. 30 : अलर्ट सिटीझन फोरम या संस्थेच्या प्रोजेक्ट आरोग्यम उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यासाठी दोन बाईक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमदार श्रीनिवास वनगा आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते या बाईक अ‍ॅम्बुलन्सचे अनावरण करण्यात आले.

अलर्ट सिटीझन फोरमने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या सहयोगाने या बाईक पुरविल्या आहेत. स्ट्रेचर, ऑक्सिजन, अतिरिक्त बॅटरी, पंखा व संपूर्णतः विलगीकरण असलेली ही बाइक अ‍ॅम्ब्युलन्स विशेषतः गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात आली असून सध्याच्या या कोव्हीड काळातही त्याचा उपयोग करता येणार आहे. जव्हार, मोखाडा सारख्या दुर्गम ठिकाणी या बाईक अ‍ॅम्ब्युलन्स उपयोगी पडतील या हेतूने बनवण्यात आल्या असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक निरंजन आहेर यांनी यावेळी दिली. या अ‍ॅम्ब्युलन्सचे चालक वैद्यकीय ज्ञान असणारे (वैद्यकीय प्रशिक्षित स्वयंसेवक) असणार आहेत.

संस्थेचा हा स्तुत्य उपक्रम असून आदिवासी भागासाठी जेथे चारचाकी वाहन पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणांसाठी या अ‍ॅम्ब्युलन्स नक्कीच उपयोगी पडतील, असे मत यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केले.

तर पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात रस्त्याशी जोडले न गेलेले असे एकूण 22 पाडे आहेत. अशा पाड्यांमधून पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही गरोदर मातांना झोळीतून रुग्णालयात आणावे लागते, हा प्रश्न लक्षात आल्यावर अलर्ट सिटीझन फोरम आणि एसबीआयने ही बाइक अ‍ॅम्ब्युलन्सची संकल्पना अमलात आणली. ज्या रस्त्यावरून मोटरसायकल जाते त्या रस्त्यावरून या बाईकमधून गरोदर मातांना किंवा गंभीर स्थितीतील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे शक्य होईल. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचून मातामृत्यूही टळतील, असे मत यावेळी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले.

दरम्यान, या अ‍ॅम्ब्युलन्स सध्या जव्हार, मोखाडासारख्या दुर्गम ठिकाणी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पुरवण्यात येतील. सध्या दोन ऍम्बुलन्स संस्थेने दिल्या असून आणखी 23 ऍम्बुलन्स लवकरच पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email

comments