सफाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. पांडुरंग अमृते यांचे करोनामुळे निधन

0
508

पालघर, दि. 20 : ग्रामीण शिक्षण संस्था सफाळेचे विद्यमान संस्थापक, विश्वस्त डॉ. पांडुरंग वामन अमृते यांचे आज, मंगळवारी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. डॉ. अमृते यांना करोनाची लागण झाल्याने मागील काही दिवसांपासुन ते अंथरुणाला खिळून होते. यातच त्यांनी आज अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रातील एक तारा निखळला असुन एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच डॉ. अमृते यांच्या पत्नीचेही करोनामुळे निधन झाले आहे. त्या 92 वर्षाच्या होत्या.

डॉ. अमृते यांनी सफाळे परिसरात वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. वैद्यकीय शिक्षण पुर्ण झाल्यावर ज्या खेड्यात डॉक्टर नसेल अशाच गावात दवाखाना काढायचा या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी 1949 साली सफाळे-आगरवाडी हा परिसर आपली कर्मभूमी म्हणून निश्चित केला. येथे त्यांनी गरिबांसाठी आयुष्यभर उत्तम सेवा देण्याचे कार्य केले. तसेच त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करताना मराठी शाळा, तालुका शाळा, शेतकी बेसिक शाळा, त्याचबरोबर ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय-आगरवाडी, जनता वाचनालय व बहि:शाल शिक्षा केंद्राची संस्थापना करून ज्ञानाबरोबरच सुसंस्कृत वाचक, श्रोता घडविण्याचे कार्यही डॉ. अमृते यांनी केले.

सफाळे ग्रामस्थांनी डॉ. अमृते यांची सेवाभावी वृत्ती पाहून 1972 साली त्यांना बहुमताने सरपंचपदी निवडून दिले आणि सफाळ्याच्या भावी विकासाचे बीज रोवले. 12 वर्षे सरपंचपद भूषविताना नि:स्वार्थपणे आणि संघटक वृत्तीने केलेल्या कार्यामुळे त्यांनी सरपंच पदाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. डॉ. अमृते यांचे वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कुठेही नसलेला टाऊन प्लॅनिंग कायदा त्यांनी सफाळ्यासाठी लागू करून घेऊन सफाळ्याचा विकास सुनियोजित होण्याकरिता अभ्यासपूर्ण मेहनत घेतली व त्यात यशस्वी झाले. यानंतर माजी सरपंच या नात्याने देखील त्यांनी सफाळे सारख्या ग्रामीण भागाचा विकास करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला.

अशाप्रकारे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांमध्ये डॉ. अमृते यांचे कार्य अद्वितीय होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने समाजाचे खूप मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments