पालघर ग्रामीण करोना अपडेट : ऑक्सिजन, आयसीयु व वेंटिलेटर्स बेड्स संपल्यात जमा; आठवडाभरात 2038 रुग्णांची वाढ

0
1488
संग्रहित छायाचित्र

पालघर, दि. 18 : पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) मागील आठवडाभरात अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्णांची संख्या 2 हजार 38 ने वाढून 4 हजार 918 वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्यमुळे जिल्ह्यातील कोव्हीड रुग्णालयांमधील ऑक्सिजन, आयसीयु व वेंटिलेटर्स बेड्स देखील संपल्यात जमा असुन केवळ बोईसरमधील चिन्मया हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे 15, आयसीयुचे 2 व वेंटिलेटर्सची सुविधा असलेले 2 बेड्स उपलब्ध आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी पालघर ग्रामीणमध्ये 723 रुग्णांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात पालघर तालुक्यातील 355, जव्हारमधील 184, डहाणूतील 72, मोखाड्यातील 35, तलासरीतील 28, विक्रमगडमधील 26, वसई ग्रामीणमधील 22 व वाडा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. करोना रुग्णवाढीचा दैनंदिन आकडा रोज नविन उच्चांक गाठत असल्याने गेल्या रविवारपासुन या रविवारपर्यंतची आकडेवारी पाहिल्यास केवळ आठवडाभरात 2 हजार 38 नवे रुग्ण वाढले आहेत. गेल्या रविवारी जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 883 इतकी होती. आता ती 4 हजार 918 वर पोहोचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या आठवडाभरात 37 रुग्णांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

बेड्स संपल्यात जमा!
करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील कोव्हीड रुग्णालयांमधील ऑक्सिजन, आयसीयु व वेंटिलेटर्स बेड्स संपल्यात जमा आहेत. याबाबतच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 302 ऑक्सिजन बेड्सपैकी 287 बेड्स भरले असुन केवळ 15 उपलब्ध आहेत. तर 35 आयसीयु व 68 वेंटिलेटर्स बेड्सपैकी प्रत्येकी 2-2 बेड्स उपलब्ध आहेत. हे सर्व बेड्स बोईसरमधील चिन्मया रुग्णालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे जर रुग्णसंख्या याच गतीने वाढत राहिली तर येत्या काही दिवसात करोना रुग्णांचे उपचाराअभावी मोठे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात 1 हजार 356 आयसोलेशन बेड्सपैकी 421 बेड्स उपलब्ध आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments