दि. 16 एप्रिल: डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कोव्हीड प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग असलेल्या शासनाच्या ” ब्रेक द चेन ” आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई आरंभली आहे. काल आशिमा यांनी तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक किराणा मालाचे दुकान व लग्नसमारंभात धाड टाकून कारवाई केली.

15 एप्रिल रोजी, सायंकाळी साडे आठच्या दरम्यान धुंदलवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील राजेश गणपत बसरा यांचे दुकान सायंकाळी आठ वाजतानंतर चालू होते व सामानाची विक्री देखील करण्यात येत होती. ही बाब आशिमा यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दुकानमालक बसरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन संबंधीत दुकान सील केले आहे.

अन्य घटनेमध्ये 15 एप्रिल रोजी रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान बहारे – बामणवाडी (तालुका डहाणू) येथे रहात्या घरी, देवराम महादेव दांडेकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा व हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर ठिकाणी आशिमा मित्तल यांनी भेट दिली असता, अंदाजे 400 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. दांडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दांडेकर हे उधवा आश्रम शाळेमध्ये शिक्षक आहेत. अशा जबाबदार पेशातील व्यक्तीने बेजबाबदारपणे वर्तन केल्यामुळे आशिमा यांनी गुरुजींची शाळा घेऊन त्यांना चांगलेच धारेवर धरले. दांडेकर गुरुजींवर विभागीय कारवाई देखील होण्याची शक्यता आहे.