पालघर व बोईसरमधील ‘या’ चार खासगी रुग्णालयांमध्ये होणार कोरोना रुग्णांवर उपचार

0
2759

पालघर, दि. 10 : पालघर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून येथे उपलब्ध असलेली आरोग्य सुविधा रुग्णांसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधेवर ताण पडत असल्याने जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयांनी कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. या रुग्णालयांमध्ये बोईसरमधील वरद हॉस्पिटल व अधिकारी लाईफलाईन, पालघरमधील फिलीया व रिलिफ हॉस्पिटल तर विक्रमगडमधील शारदा हॉस्पिटलचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधील करोना सेंटर्समधील खाटा देखील वाढण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पालघर प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, डहाणू तहसिलदार राहुल सारंग, तालुका आरोग्य अधिकारी पालघर डॉ. अभिजित खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गाडेकर, डहाणूचे गटविकास अधिकारी बी. एच. भरक्षे, यांनी आज सदर रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

बोईसरमधील बेटेगाव येथील अधिकारी लाईफ लाईनमध्ये 60 खाटांचे, वरद हॉस्पिटलमध्ये 50 खाटांचे, पालघरमधील फिलिया हॉस्पिटलमध्ये 50 खाटांचे व रिलीफ हॉस्पिटलमध्ये 40 खाटांचे तर विक्रमगड शारदा हॉस्पिटलमध्ये 40 खाटांचे कोव्हीड केअर सेंटर तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

दरम्यान, पालघर ग्रामीण रुग्णालयात 20 खाटा उपलब्ध असुन त्यात 10 खाटा वाढवण्यात आल्या आहेत. डहाणू उपजिल्हा रुग्णालयात 16 खाटा आहेत, त्यात 18 वाढवण्यात आल्या आहेत. तर वाणगाव ग्रामीण रुग्णालयात 30 खाटांची सुविधा आहे. त्यात 10 खाटांची वाढ करण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments