डहाणू पोलीस उपविभागामार्फत रक्तदान शिबिर संपन्न; 308 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
925

डहाणू, दि. 9 : पालघर जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील विविध भागात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असुन पालघर व बोईसरनंतर आज, 9 एप्रिल रोजी डहाणू येथे रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी 308 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात डहाणू, घोलवड व तलासरी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नागरीकांचा समावेश आहे.

राज्यात करोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तसंकलनासाठी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. यापुर्वी 4 एप्रिल रोजी पालघर पोलीस स्टेशनतर्फे व 6 एप्रिल रोजी बोईसर उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांतर्फे रक्तदान शिबिर पार पडले. तर आज डहाणू पोलीस उपविभागामार्फत शहरातील दशश्री माळी समाज हॉल येथे शिबिर घेण्यात आले. यावेळी डहाणू, घोलवड व तलासरी पोलीस स्टेशनमधील पुरुष व महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच होमगार्ड, पोलीस पाटील, ग्रामरक्षक दल, सागर रक्षक दल व नागरीकांनी शिबिरात भाग घेऊन 308 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना डहाणु पोलीस उपविभागामार्फत पुष्पगुच्छ देऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

दरम्यान, उद्या 10 एप्रिल रोजी जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत वाडा पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी या शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments