पोलीस दलातर्फे बोईसर येथे आयोजित रक्तदान शिबिरात 404 युनिट रक्तसंकलन!

0
895

बोईसर, दि. 7 : महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेल्या रक्त तुटवड्याच्या पार्श्‍वभुमीवर पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे विविध भागात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असुन काल, मंगळवारी बोईसर येथे आयोजित शिबिरास या भागातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसह नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने 404 युनिट रक्त संकलित करण्यात आले. तर 4 एप्रिल रोजी पालघर येथील शिबिरात 202 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.

करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्याने राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पालघर जिल्हा पोलीस दलाने रक्तसंकलनासाठी पुढाकार घेतला असुन विविध पोलीस स्टेशन अंतर्गत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. 4 एप्रिल रोजी पालघर पोलीस स्टेशनतर्फे रक्तदान शिबीर पार पडले. तर काल, 6 एप्रिल रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान बोईसर उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांमार्फत येथील टिमा हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बोईसर, वाणगांव व तारापुर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच या पोलीस स्टेशन हद्दीतील तरुण व महिला वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. यावेळी एकुण 404 युनिट रक्तसंकलित करण्यात आले. रक्तदात्यांना बोईसर पोलीस उपविभागामार्फत पुष्पगुच्छ देऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

दरम्यान, 8 एप्रिल रोजी डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत डहाणूतील मसोली येथील दशाश्री माळी समाज हॉल येथे, तर जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत 10 एप्रिल रोजी वाडा पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments