जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन बंद!

जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश!

0
3676

पालघर, दि. 2 : जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हाधिकार्‍यांनी पुन्हा एकदा नविन आदेश काढून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पारित केला आहे. तर 10 व 12 वीचे वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय ऐच्छिक असुन शाळा व्यवस्थापनाने याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे.

राज्य शासनाने यापुर्वी राज्यातील 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देताना शिक्षकांनी स्वत:ची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्त आहेत त्या गावातच करावी असे निर्देश दिले होते. मात्र काही शिक्षक बाहेर गावातून शाळेत ये-जा करीत असल्याचे तसेच यामुळे काही शिक्षक कोविड-19 ने बाधित झाल्याने विद्यार्थ्यांना सुध्दा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. असा प्रकार जिल्ह्यात घडू नये तसेच जिल्ह्यातील कोविड-19 चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित/विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवणे आवश्यक असुन येत्या 5 एप्रिलपासुन पुढील आदेशापर्यंत बंदीचा आदेश लागू होणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

तर 10 व 12 वी चे वर्ग सुरु ठेवणे शाळा व्यवस्थापनांना ऐच्छिक असणार आहे. मात्र आजारी विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक, कर्मचारी शाळेत प्रवेश करणार नाहीत तसेच आजारी असलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल, याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51(ब), भारतीय दंड संहिते (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी 26 मार्च रोजी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र 31 मार्च रोजी हा निर्णय मागे घेण्यात आला होता.

Print Friendly, PDF & Email

comments