करोना : पालघर तालुक्यात आज नव्या 103 रुग्णांची नोंद; जिल्ह्यात एकुण 155 रुग्ण आढळले

0
2063

पालघर, दि. 1 : पालघर जिल्ह्यातील (ग्रामीण) करोना रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढतच असुन आज, 1 एप्रिल रोजी जिल्ह्यात एकुण 155 नव्या रुग्णांची भर पडली आहे. गंभीर बाब म्हणजे केवळ पालघर तालुक्यातच 103 रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, वसई-विरार महापालिका क्षेत्रात आज 219 रुग्णांची नोंद झाली आहे.

पालघर ग्रामीणमध्ये मोडणार्‍या पालघर तालुक्यात मागील काही दिवसांपासुन सतत 50 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवडाभराची आकडेवारी पाहिल्यास तालुक्यात 27 मार्च रोजी 65, 28 मार्च रोजी 65, 29 मार्च रोजी 86, 30 मार्च रोजी 51, 31 मार्च रोजी 45 व आज 103 अशा एकुण 415 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात आता अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 653 वर पोचली आहे. तर आतापर्यंत करोना लागण झालेल्या 9 हजार 410 रुग्णांपैकी 155 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पालघरपाठोपाठ आज डहाणू तालुक्यात 17, विक्रमगडमध्ये 9, वाड्यात 8, तलासरीत 7, वसई ग्रामीणमध्ये 6, मोखाड्यात 4 व जव्हारमध्ये एक नवीन रुग्ण आढळून आला आहे.

दरम्यान, एकुणच पालघर जिल्ह्यात (वसई-विरार महापालिका क्षेत्रासह) आज 374 नवे रुग्ण आढळून आले असुन जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या आता 2968 वर पोहोचली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments