जिल्ह्यात 5 एप्रिलपासुन लागू होणारे आदेश रद्द, मात्र नियम मोडणार्‍यांना बसणार मोठा दंड

अटी व शर्तीसह लग्न सोहाळ्यांवरील बंदी उठवली

0
8025

पालघर, दि. 31 : जिल्ह्यात करोना (कोव्हिड-19) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 26 मार्च रोजी पार पडलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत विविध प्रकारचे निर्बंध लादण्याचे ठरले होते. तशाप्रकारचे आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी काढले होते. मात्र हे आदेश आज मागे घेण्यात आले असुन काही नवीन करोना गाईडलाईन्स प्रशासनातर्फे जारी करण्यात आले आहेत. यात नियम मोडणार्‍यांना आर्थिक दंड भरावा लागणार आहे. तसेच लग्न समारंभांवरील बंदी देखील अटी व शर्तींवर उठविण्यात आली आहे.

आज लागू करण्यात आलेल्या नव्या गाईडलाईन्सनुसार, आता संध्याकाळी 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी असल्याने या नियमाचे उल्लघंन करणार्‍यास प्रति व्यक्ती 1 हजार रुपये दंड, संध्याकाळी 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक ठिकाणे (बगीचा/समुद्र किनारा-उद्यान) बंद राहणार आहेत. या ठिकाणी नियमांचे उल्लघंन केल्यास प्रति व्यक्ती 1 हजार रुपये दंड, मास्क परिधान न केल्यास 500 रुपये दंड व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार रुपये इतका दंड करण्यात येईल.

दरम्यान, 15 एप्रिल 2021 पासूनचे विवाह बंदीचे आदेश रद्द करण्यात आले असून विवाह समारंभास 50 लोकांच्या मर्यादेत संबंधित पोलीस स्टेशनकडून परवानगी घेण्याच्या व कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी राहील. जिल्हातील सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंतच सुरु राहतील. खाद्यगृह, परमिट रुम/बार सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत सुरु राहतील. होम डिलिव्हरी किचन/वितरण कक्ष रात्री 10 पर्यंत सुरु राहतील. सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्ये गर्दी टाळण्यासाठी निवडून आलेल्या लोक प्रतिनिधी व्यतिरिक्त तातडीचे काम असलेल्या अभ्यागतांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांमार्फत 26 मार्चचे आदेश रद्द करण्यात आले असले तरी, राज्य शासनाच्या 27 मार्च रोजीच्या आदेशानुसार सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि धार्मिक कार्यक्रमांना 15 एप्रिलपर्यंत परवानगी नसेल. त्याचप्रमाणे अशा जमावासाठी सभागृह तथा कक्षांचा वापर करण्यावरही निर्बंध असेल. लग्नकार्यात कमाल 50 लोक तर अंतिम संस्कारासाठी 20 लोकांना हजर राहण्याची अगोदर दिलेली परवानगी 15 एप्रिलपर्यंत लागू असेल. सर्व खाजगी कार्यालय आरोग्याशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून 50 टक्के उपस्थितीतीसह काम करतील. अशा ठिकाणी मास्क न घालणार्‍यांना प्रवेश देण्यात येणार नाही. तर शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर आणि सार्वजनिक वापरासाठी सॅनीटायझरची व्यवस्था करावी लागेल.

Print Friendly, PDF & Email

comments