मोखाड्यात घराला लागलेल्या भीषण आगीत चौघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी!

0
893

मोखाडा, दि. 30 : तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे 28 मार्च रोजी मध्यरात्री दुकान व त्याला लागूनच असलेल्या दुकानमालकाच्या घराला भीषण आग लागून चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हृदयद्रावक घटनेत मृत पावलेल्यांमध्ये 10 व 15 वर्षीय मुलांचा समावेश आहे.

ब्राह्मणगाव येथे अनंता बाळू मौळे यांचे किराणा मालाचे दुकान होते. या दुकानाला लागूनच मौळे यांचे घर होते. 28 मार्च रोजी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत मौळे यांचे घरही भक्ष्यस्थानी पडल्याने दुकान व घर जळून खाक झाले. या दुर्दैवी घटनेत मौळे यांची आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, मुलगी पल्लवी मौळे (15) व मुलगा कृष्णा मौळे (10) असे चौघे जण मृत पावले. तर मुलगा भावेश मौळे (12) व मुलगी अश्विनी मौळे (17) असे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, बाळू मौळे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असुन त्यांच्यावर मोखाड्यातच उपचार करण्यात आले.

  • पालकमंत्री दादाजी भुसेंनी घेतली जखमींची भेट
    दरम्यान, या घटनेनंतर कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावरील उपचारांविषयीची सविस्तर माहिती घेतली. उपचारात कोणत्याही प्रकारची कमतरता येऊ नये, त्याचबरोबर उपचाराचा दैनंदिन अहवाल द्यावा, असे निर्देशही पालकमंत्री भुसे यांनी नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रेखाराव खंडे यांना दिले. यावेळी मोखाडा तहसिलदार वैभव पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवास व अमित पाटील आदी उपस्थित होते. भूसे यांनी घटनास्थळाला देखील भेट देऊन पाहणी केली.
Print Friendly, PDF & Email

comments