वाडा/प्रतिनिधी : लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्यसेवेत पिछाडीवर असलेल्या वाडा तालुक्यातील गोरगरीब व गरजू नागरीकांसाठी आनंदाची बातमी असुन वाडा ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यास मान्यता मिळाली आहे. येत्या काळात 100 खाटांचे सुसज्ज असे हे रुग्णालय उभे राहणार आहे.
वाडा ग्रामीण रुग्णालयात अनेक सोयी सुविधांंचा अभाव व तज्ज्ञांची कमतरता असल्याने येथील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासुन वाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन 100 खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारावे, अशी मागणी स्थानिक करत होते. शिवसेनेच्या ज्योती ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते किरण थोरात तसेच रुग्णमित्र संघटना यांच्यासह अनेकांनी वर्षानुवर्षे यासाठी पाठपुरावा देखील केला होता. अखेर या मागणीला 26 मार्च रोजी शासन दरबारी मान्यता मिळाली असून सार्वजनिक आरोग्य विभागाने तसे पत्रकही जारी केले आहे. दरम्यान, शासनाने वाडा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यास मान्यता दिली असली तरी, आता लवकरात लवकर हे रुग्णालय उभारुन नागरीकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
