प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला गुन्हा!

मृतदेह गोणीत भरुन निघाले होते विल्हेवाट लावायला

0
1978

वाडा, दि. 28 : वसईतील एका महिला पोलिसाने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता वाड्यातही अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने आपल्या 30 वर्षीय पतीची प्रियकराच्या मदतीने कट रचून हत्या केली. यानंतर अंधाराचा फायदा घेत मृतदाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला व सदर महिलेसह तिचा प्रियकर व अन्य एकाला पोलिसांनी अटक केली. दिवेश शर्मा (वय 30) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर कल्याणीदेवी शर्मा, तिचा प्रियकर पिंटुकुमार सिंग (वय 20) व रतनकुमार सिंग (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोणसई येथे राहणार्‍या दिवेश शर्मा याची पत्नी कल्याणीदेवी हिचे पिंटुकुमारशी विवाहबाह्य संबंध होते. मात्र पती दिवेश शर्मा हा प्रेमात अडथळा ठरत असल्याने दोघांनी दिवेशच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार घटनेच्या दोन दिवसांपुर्वीच पिंटुकुमार सिंग व रतनकुमार सिंग कोणसई येथे रहावयास आले. 25 मार्च रोजी त्यांनी दिवेशला दारु पाजली व त्यानंतर कपड्याने गळा आवळून त्याची हत्या केली. घटनेच्या दिवशी परिसरात विद्युत पुरवठा खंडीत असल्याने आरोपींनी अंधाराचा फायदा घेत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या इराद्याने मृतदेह गोणीत भरला व तिघेही मृतदेह घेऊन निर्जणस्थळी निघाले. मात्र गावातून बाहेर पडण्यापुर्वीच वीजपुरवठा सुरळीत झाल्याने आरोपींचा हा प्रयत्न फसला. तिघेही संशयास्पदरित्या गोणीत काहीतरी नेत असल्याचे गावातील तरुणांनी पाहिल्यानंतर त्यांनी चोर समजून तिघांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या आरोपींनी मृतदेह तेथेच टाकून पळ काढला. गोणीतून मृतदेहाचे पाय बाहेर आल्याचे दिसल्यानंतर तरुणांनी त्यांचा पाठलाग करुन पिंटुकुमारला पकडले. मात्र कल्याणीदेवी व रतनकुमार तेथून फरार झाले. यानंतर गावकरी घटनास्थळी जमा झाले व त्यांनी पोलिसांना याबाबत खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला व काही तासांच्या तपासानंतर फरार आरोपींनाही ताब्यात घेतले.

दरम्यान, याप्रकरणी आरोपींविरोधात वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302, 201 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता तिघांनाही 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

  • पोलिसांकडून गावकर्‍यांचे कौतूक
    कोनसई गावातील रहिवाशांनी सतर्कता दाखवल्याने हा गुन्हा उघडकीस आला व तात्काळ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे इतर गावातील रहिवाशांनी देखील अशाचप्रकारे सतर्कता दाखवून पोलिसांना सहकार्य करावे, असे म्हणत पोलिसांनी कोनसई गावातील रहिवाशांचे कौतूक केले.
Print Friendly, PDF & Email

comments