डहाणू दि. 27: आज भल्या पहाटे घोलवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दमण व सेल्वास मधून उत्पादन शुल्क बुडवून दारुची तस्करी करणाऱ्या टोळीने पोलिसांवर हल्ला चढवल्याची घटना घडली आहे. हल्ल्यामध्ये पोलिसांच्या ताब्यातील 2 वाहनांची तोडफोड करण्यात आली असून आरोपींनी मुद्देमाल व स्वतःच्या क्रेटा गाडीसह पोबारा केला आहे. ह्या हल्ल्यात एका पोलिसाला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपी हे डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचा पोलीसांना संशय असून आशागड, चरी नाका व सावटा येथे शोध मोहीम राबवली जात आहे. याबाबत घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या व्यस्त आहे, प्रेस नोट द्वारे माहिती दिली जाईल असे सांगून अधिक तपशील देण्याचे टाळले आहे.