पालघर जिल्ह्यात 5 एप्रिलपासुन पुन्हा निर्बंध; शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पुर्णपणे बंद!

0
6524

दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार

पालघर, दि. 26 : पालघर जिल्ह्यात (वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून) मागील काही दिवसांपासुन करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली मोठी वाढ लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असुन येत्या पाच एप्रिलपासुन जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने, मॉल्स, हातगाडी व ठेल्यांवरील खाद्य पदार्थ विके्रत्यांसह अनेक बाबींवर वेळेचे व नागरीक क्षमतेचे बंधन लादण्यात आले आहे.

आज, 26 मार्च रोजी पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्ह्यातील कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चर्चा होऊन याबाबत रुपरेषा निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार येत्या 5 एप्रिलपासुन विविध बाबींवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पाच एप्रिलपासुन जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजेस व कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील 10 वी व 12 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने उपस्थिती ऐच्छिक राहील. तसेच या संस्थांद्वारे ऑनलाईन स्वरुपात कामकाज सूरु ठेवता येईल. तर राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन किंवा शिक्षण मंडळ स्तरावरील यापुर्वीच घोषित झालेल्या परीक्षा कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व दुकाने 5 एप्रिलपासुन सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु राहतील. मात्र हे निर्बंध अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रांसाठी जिवनावश्यक वस्तू, दूध, पेट्रोल पंप व औषधांच्या दुकानांना लागू राहणार नाही. 15 एप्रिलपर्यंत पुर्वनियोजित असलेल्या लग्न व इतर समारंभांच्या बाबतीत स्थानिक प्रशासन व संबंधित पोलीस स्टेशनकडून परवानगी घेऊन कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आयोजित करण्यास परवानगी असणार आहे. 15 एप्रिलनंतर मात्र लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स व तत्सम ठिकाणी लग्न व इतर समारंभ आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अत्यंविधी कार्यक्रमामध्ये देखील 20 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.

खाद्यगृहे व बारमध्ये ग्राहकांचे आगमन व निर्गमन नियंत्रित करण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ सेवन करण्यासाठी टेबलाची व्यवस्था असते, अशीच खाद्यगृहे व बार सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सूरु राहतील. होम डिलिव्हरीचे किचन रात्री 10 वाजेपर्यंत सूरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. तर हातगाडी, ठेले व स्टॉल ज्यावर खाद्य पदार्थ सेवन केले जाते व वितरण केले जाते अशी ठिकाणे सकाळी 7 ते संध्याकाळी 8 या कालावधीतच कोविडचे सर्व नियम पाळून सुरु राहतील.

दरम्यान, जिम, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक हे वैयक्तीक सरावासाठी सूरु राहतील. तर सामूहिक स्पर्धा व इतर कार्यक्रम बंद राहतील. सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे देखील संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सूरु राहतील.

भाजी मंडई 50% क्षमतेने सूरु राहतील आणि एका-आड-एक या प्रमाणे ओटे सूरु राहतील. सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट यामध्ये क्षमतेच्या 50% व्यक्तींनाच उपस्थिती बंधनकारक राहील. प्रवेश देतांना प्रत्येक व्यक्तीस विना मास्क प्रवेश देण्यास मनाई असेल. अशा ठिकाणी प्रवेश द्वारावर थर्मल स्क्रिनिंग घेण बंधनकारक राहील. ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही याची खात्री करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तापमान मोजण्याचे उपकरण वापरावे लागले.

या निर्बंधाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाजगी आस्थापना केंद्र शासन जो पर्यंत कोविड-19 च्या आजारास आपत्ती म्हणून घोषित ठेवत आहे, त्या कालावधीपर्यंत बंद करण्यात येतील व संबंधित धारकांविरुध्द दंडात्मक कार्यवाही देखील करण्यात येईल. शॉपिंग मॉल्सना देखील करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असुन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहे.

ज्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे त्यांनी चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत गृह अलगीकरणमध्ये राहणे आवश्यक राहील. अशा व्यक्ती घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. होम आयोसोलेशनमध्ये असल्यास याबाबतची माहिती स्थानिक अधिकार्‍यांना तसेच वैद्यकीय अधिकारी यांना द्यावी लागेल. रुग्ण बाधित झाल्याच्या दिवसापासून दरवाज्यावर होम आयोसोलेशन सुस्पष्ट ठिकाणी बोर्ड लावण्यात येईल. बाधित रुग्णावर होम क्वांरटाईनचा शिक्का मारुन कुटुंबातील व्यक्तींनी देखील बाधित रुग्णाच्या हालचालीवर लक्ष देणे तसेच त्यांनी नियमित मास्क वापरणे बंधनकारक राहील. अलगीकरणाचे कोणतेही उल्लंघन केल्यास नियुक्त केलेले स्थानिक अधिकारी संबंधित इसमाला जवळच्या कोविड सेंटरमध्ये तात्काळ दाखल करतील.

दरम्यान, या निर्बंधाचे उल्लघंन करणार्‍या संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Print Friendly, PDF & Email

comments