विनापरवाना डिझेल विक्री; महामार्गावर अडीच हजार लिटर डिझेल जप्त

बोईसर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

0
399
संग्रहित छायाचित्र

तलासरी, दि. 26 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बेकायदेशीररित्या आयशर टेम्पोत डिझेलची साठवणूक करुन विक्री करणार्‍या आरोपीवर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एकुण 7 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 2 लाख 17 हजार रुपये किंमतीच्या 2 हजार 500 लीटर डिझेलसह टेम्पो व इतर सामुग्रीचा समावेश आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अच्छाड गावाच्या हद्दीत एका आयशर टेम्पोमधुन विनापरवाना डिझेलची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन 25 मार्च रोजीच्या मध्यरात्री 3 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असल्यास जी.जे.06/बी.टी. 2706 या क्रमांकाच्या टेम्पोमध्ये 2000 लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या 3 टाक्या व त्यात सुमारे 2 हजार 500 लिटर डिझेल तसेच डिझेल भरण्यासाठी वापरात येणारे रेट मिटर व इतर सामुग्री आढळून आली. यावेळी संबंधितांकडे डिझेल विक्रीचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी टेम्पो, डिझेल व इतर सामग्रीसह एकुण 7 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याप्रकरणातील 39 वर्षीय आरोपीवर तलासरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 285 व 34 सह अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे पोलीस उपनिरीक्षक आशीष पाटील व इतर पोलीस अंमलदार ही कारवाई केली असुन अधिक तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments