अखेर बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी जागा भेटली!

0
1782

संजयनगर भागात उभे राहणार 50 खाटांचे सुसज्ज रुग्णालय

बोईसर, दि. 21 : मागील अनेक वर्षांपासुन जागेअभावी रखडलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागणार आहे. सरावली हद्दीतील संजयनगर भागात सुमारे 60 गुंठे जागेवर बोईसर ग्रामीण रुग्णालय उभारले जाणार असुन 50 खाटांचे सुसज्ज असे हे रुग्णालय असणार आहे.

मोठ्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये गणल्या जाणार्‍या बोईसर शहरात लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय आरोग्य सेवेची मोठी कमतरता दिसुन येते. बोईसर शहरातील एकमेव अशा नवापुर येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत देखील मोडकळीस आल्याने मागील अनेक वर्षांपासुन नवे ग्रामीण रुग्णालय उभारण्याची मागणी नागरीकांकडून होत होती. ही मागणी लक्षात घेता बोईसर शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चित्रालयजवळ रुग्णालयासाठी जागा देखील निश्‍चित करण्यात आली होती. मात्र सदर जागेवर बीएआरसीने आपला हक्क सांगून, न्यायालयात हे प्रकरण गेल्याने ग्रामीण रुग्णालायाचा प्रश्‍न पुन्हा रखडला होता. आता सरावली महसूल क्षेत्रात मोडणार्‍या संजयनगर भागात (सर्वे नं. 104/अ) सुमारे 60 गुंठे जागेवर रुग्णालयाची इमारत उभी राहणार असुन सार्वजनिक बांधकाम विभागासह तहसिलदार सुनिल शिंदे व जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी जागेची पाहणी केली आहे. या ठिकाणी 50 खाटांचे सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात येणार असुन रुग्णालयाचा आराखडा बनविण्याचे काम देखील लवकरच सुरु होणार असल्याचे कळते.

दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाअभावी खाजगी रुग्णालयांमध्ये मोठी किंमत मोजून उपचार घेणार्‍या गोरगरिब नागरीकांना या नव्या ग्रामीण रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळणार असुन लवकरत लवकर हे रुग्णालय उभे राहावे, अशी मागणी होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments