डहाणू नगरपरिषदेचे आजी व माजी नगराध्यक्ष पुन्हा भिडले

0
3078

डहाणू दि. 12 मार्च: डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत व माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांच्यात पुन्हा एकदा राजकीय युद्ध सुरु झाले आहे. मिहीर शहा नगराध्यक्ष असताना भरत राजपूत हे डहाणूरोड जनता सहकारी बॅन्केचे अध्यक्ष होते. आज नेमकी उलटी परिस्थिती झाली आहे. शहा हे राजपूतना नगराध्यक्षपदावरुन खाली उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर राजपूत हे पुन्हा बॅन्क ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखत आहेत.

डहाणू नगरपरिषदेच्या 2013 च्या निवडणूकीच्या वेळी डहाणूरोड जनता बॅंकेत घोटाळा केल्याच्या आरोपाखाली भरत राजपूत व जगदीश राजपूत यांना ऐन निवडणूकीच्या तोंडावर जेलमध्ये जावे लागले होते. राजपूत बंधूंनी जेलमधून निवडणूक लढवली आणि जगदीश राजपूत पराभूत झाले असले तरी, भरत राजपूत यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. ह्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश पारेख मात्र पराभूत झाल्याने बहुमत मिळवलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नगराध्यक्षपदाची संधी मिहिर शहांकडे चालून आली. भरत राजपूत कॉंग्रेस गट नेता झाले. त्यानंतर आलेल्या मोदी लाटेत राज्यातही भाजपचे सरकार आले. राजपूत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यावेळच्या शहा व राजपूत यांच्या लढाईत वणगा व तत्कालीन आमदार पास्कल धनारे यांनी सहभाग घेतल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची उचलबांगडी झाली होती.

शहा यांच्या मालकीचा रिलायन्स मॉल

दरम्यान, 2016 मध्ये झालेल्या डहाणूरोड जनता सहकारी बॅन्केच्या सार्वत्रिक निवडणूकीत राजपूत यांनी भाजपप्रणीत पॅनल उभे केले होते. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता होती. तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा, तत्कालीन खासदार चिंतामण वणगा यांच्यासारखी दिग्गज मंडळी प्रचारात उतरली होती. मात्र बॅन्केत राजेश पारेख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा एकतर्फी विजय झाला व राजपूत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण पॅनलला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणूकीत मिहीर शहा यांची देखील महत्वपूर्ण भूमिका होती. राजेश पारेख बॅन्केचे अध्यक्ष झाले. दरम्यान ऑक्टोबर 2020 मध्ये राजेश पारेख यांचे अकाली निधन झाल्यानंतर मिहीर शहा हे बॅन्केचे विद्यमान अध्यक्ष झाले आहेत.

2016 च्या बॅन्केच्या निवडणूकीत मिहीर शहा निवडून आल्यानंतर भरत राजपूत यांनी मिहीर शहा, भावेश देसाई व संजय कर्णावट ह्या तीन संचालकांना अपात्र ठरविण्यासाठी जिल्हा उप निबंधकांकडे याचिका केली व त्यात त्यांना यश देखील आले. 3 संचालक अपात्र ठरले. मिहीर शहा व भावेश देसाई हे बॅंकेचे निवडणूक लढविण्याआधी कर्जधारक असल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले. मात्र संचालक नसताना कर्ज घेणे हा गुन्हा नाही व कर्ज थकीत नाही असा युक्तिवाद करुन अपिलात त्यांचे संचालकपद शाबूत राहिले. संजय कर्णावट हे निवडणूक लढविताना बॅन्केचे पिग्मी कलेक्शन एजंट होते. बॅन्केचे संचालक झाल्यानंतरही बॅन्केशी व्यवहारात राहिल्यामुळे कर्णावट मात्र तांत्रिकदृष्ट्या अपात्रच राहिले.

डहाणूरोड जनता सहकारी बॅन्केच्या निवडणूकीत पराभव पत्करल्यानंतर दीड वर्षांनी झालेल्या डहाणू नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक लढत झाली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा विश्वास संपादन करुन, भाजपमध्ये स्थिरस्थावर झालेल्या भरत राजपूत यांना पक्षात शह देण्यासाठी मिहीर शहा यांनी त्यांचे निकटवर्ती रविंद्र फाटक यांना भाजपमध्ये पाठवले. त्या पाठोपाठ ते स्वतः देखील गेले. भाजपमध्ये शहा व फाटक हे दोघे नगराध्यक्षपदासाठी राजपूत यांच्याशी स्पर्धा करता करता परस्परांशी स्पर्धा करु लागले व पिछाडीवर गेले. तेथे अपेक्षीत यश दिसत नाही हे पाहून पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परतले. भाजपमधून राजपूत यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे घर वापसी केलेले मिहीर शहा मैदानात उतरले. राजपूत यांनी शहा यांना पराभूत करुन बॅन्केच्या निवडणूकीतील पराभवाचा हिशेब चुकता केला.

ह्या लढाईत मिहीर शहा यांनी देखील राजपूत यांना शह देण्यासाठी योजना आखली. राजपूत यांच्या विरोधात, त्यांनी व त्यांच्या कुटूंबीयांनी बॅन्केतून 6 कोटी रुपये रोखीने काढल्यामुळे व मोठ्याप्रमाणात रोखीने व्यवहार केल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेबरोबरच अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) कारवाई सुरु केली होती. दरम्यान ED चे अधिकारी सतीष शर्मा यांनी राजपूत यांच्यावरील आरोप मागे घेऊन तसे विशेष न्यायालयाला कळविल्यामुळे राजपूत यांना क्लिन चिट मिळाली होती. 16 ऑगस्ट 2018 रोजी शहा यांचा निकटवर्तीय सहकारी किरण पटेल याने ज्येष्ठ वकील नितीन गांगल यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन ED च्या माघार घेण्यावर आक्षेप घेणारी याचिका (Criminal Revision Application No. 439/2018) दाखल केली. याचिकेत सतीष शर्मांसह भरत राजपूत, जगदीश राजपूत व राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर 13 जानेवारी 2021 रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने 19 जानेवारी 2021 रोजी प्रकरणाची कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे निर्देश दिले. भरत व जगदीश यांनी आपले म्हणणे न्यायालयाला सादर केले असल्याचे समजते.

मिहीर शहा यांनीच किरण पटेलला पुढे करुन ED ची कारवाई मागे लावण्याचा प्रयत्न केल्याच्या भावनेतून चिडलेल्या नगराध्यक्ष राजपूत यांनी देखील डहाणू नगरपरिषदेतील शहांच्या चंद्रा मॉलची फाईल उघडली व तक्रार करुन मुख्याधिकारी पिंपळेंना अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी नोटीस बजावण्यास भाग पाडले. शहा यांच्या मालकीच्या सध्या रिलायन्सचा मॉल असलेल्या चंद्रा मॉलच्या इमारतीच्या मागील बाजूची उंची 4.5 मीटरने अधिक असल्याचे नमूद करुन, अतिरिक्त बांधकाम 30 दिवसांच्या आत तोडून टाकावे अशी 3 मार्च 2021 रोजीची नोटीस शहा यांना मिळाली आहे. शहा यांनी आपण कुठल्याही स्वरुपाचे अनधिकृत बांधकाम केलेले नसून मंजूर आराखड्याप्रमाणेच बांधकाम केल्याचा दावा केला आहे. रिलायन्स मॉलच्या 2 मजल्यांना आधीच मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांच्या कार्यकाळात भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने तूर्तास मॉलला अडचण नसली तरी अतिरिक्त उंचीमुळे वादग्रस्त ठरलेल्या मागील बाजूच्या मिनी थिएटरचा लाभ घेणे डहाणूकरांसाठी लांबणीवर पडले आहे.

जून 2021 नंतर केव्हाही डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेच्या निवडणूका लागतील. कोव्हिड विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक 6 महिने लांबणीवर पडू शकते. त्या नंतर वर्षभराने डहाणू नगरपरिषदेची निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण पुढील 2 वर्षे तापलेलेच राहील अशी चिन्हे आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments