पालघर, दि. 11 : पालघर जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसंदिवस वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासह नागरीकांना काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. असे असताना जव्हार तालुक्यात आज करोना रुग्णवाढीचा भडका पाहयला मिळाला आहे. एरवी 5 ते 7 किंवा एकही रुग्ण न आढळणार्या जव्हारसारख्या ग्रामीण भागात आज अचानक 30 नव्या रुग्णांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे पालघर व डहाणूनंतर आता रुग्णवाढीच्या शर्यतीत जव्हार तालुकाही सामिल झाला आहे.
पालघर जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण 42 नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. यात पालघर 6, डहाणू 6 व जव्हार तालुक्यातील 30 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, यापुर्वी जव्हारमध्ये काल, बुधवारी एकही रुग्ण आढळून आला नव्हता. तर 9 मार्च रोजी 7, 8 मार्च रोजी 5, 7 मार्च रोजी 5 व 6 मार्च रोजी सर्वाधिक 10 रुग्ण आढळून आले होते. आज मात्र अचानक 30 रुग्ण आढळून आल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.
- जिल्हाधिकार्यांच्या बैठका!
जिल्ह्यातील करोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत कालच जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची तसेच जिल्ह्यातील विविध धर्मगुरुंसोबत बैठक घेतली. या बैठकांमध्ये बोलताना जिल्हाधिकार्यांनी नागरीकांना करोना नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करण्याचे तसेच सर्व नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले.