लॉक डाऊनचे दुष्परिणाम – डहाणूतील पूजन भोजनालय बंद करुन मालक गायब

0
5057

दि. 9 मार्च: डहाणूतील सुप्रसिद्ध अशा पूजन भोजनालयाचा मालक महेंद्र रावळ याने काही दिवसांपूर्वी भोजनालय बंद करुन कुटूंबासह डहाणूतून पोबारा केला आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे त्याचा मुलगा 10 वी च्या वर्गात होता तर मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. महेंद्र मनमिळाऊ स्वभावाचा व सरळमार्गी होता. मात्र हीच त्याची कमजोरी ठरली.

महेंद्र रावळचा पटेल प्लाझा, डहाणूरोड (पश्चिम) येथील फ्लॅट

लॉक डाऊनच्या कालावधीत त्याने 10% मासिक व्याजदराने कर्ज घेऊन दिवस ढकलले. मात्र कर्ज वसुलीसाठी सावकारांनी तगादा लावल्याने त्याने जिवाच्या भीतीने गाव सोडले असावे असा कयास बांधला जात आहे. महेंद्रने पलायन केले की त्याच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्याला पळवून लावले गेले, याबाबत अधिक तपशील समजू शकलेला नाही. याबाबत डहाणू पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता, अजून पर्यंत हरवल्याची तक्रार किंवा कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले. महेंद्रच्या घराची पोलीसांनी तपासणी केल्याच्या वृत्ताचा देखील डहाणू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी इन्कार केला आहे. महेंद्रचा रहाता फ्लॅट, पूजन भोजनालय व कंक्राडी येथील गोडाऊन त्याच्या देणेकऱ्यांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते.

Print Friendly, PDF & Email

comments