डहाणूची श्री जी अपार्टमेंट: श्रीजी कोणाला पावणार? … बातमी मागची बातमी

0
3033

दि. 9 मार्च : डहाणूतील बहुचर्चित अशी 2 मजले अनधिकृत असताना सरकारी यंत्रणांच्या नाकावर टिच्चून वर्षानुवर्षे उभी असलेली वादग्रस्त श्रीजी इमारत जमीनदोस्त झाली असली तरी तीचा वादग्रस्तपणा कायम राहिला आहे. आता त्या इमारतीच्या जागेवर, 56 लोकांची दावेदारी सांगणारा फलक लागलेला आहे. 23 जानेवारी 2021 रोजी पहाटेच्या सुमारास ह्या जागेत तळ मजल्याचे अर्धवट राहिलेले बांधकाम पाडण्यासाठी डहाणू नगरपालिकेचा कंत्राटदार सचिन पाटील 2 जेसीबी व ट्रकसह गेला असता श्री जी अपार्टमेंट हाऊसिंग सोसायटीचे सचिव राकेश खेरोडीया यांनी त्यास विरोध केला. वादावादीमध्ये जेसीबी व ट्रकची तोडफोड देखील झाली होती व खेरोडीयावर गुन्हा देखील दाखल झाला होता.

हे श्री जी अपार्टमेंटचे नेमके प्रकरण काय?
तळ मजला + 4 माळ्यांची ही इमारत मागील काही वर्षांपासून नगरपरिषदेने कागदोपत्री धोकादायक ठरवली होती. पुढे ती पोलीस बळाचा वापर करुन रिकामी देखील करुन घेण्यात आली. इमारतीचे विकासक प्रदीप के. शहा यांचे निवासस्थान इमारतीच्या बाजूला असल्यामुळे त्यांनी धोकादायक इमारत पाडून टाकावी अशी मागणी केली होती. डहाणू नगरपरिषदेने इमारतीचा संरचनात्मक स्थिरतेची (स्ट्रक्चरल ऑडिट) तपासणी वृषभ सुरेंद्र कर्णावट ह्या नोंदणीकृत अभियंत्याकडून करुन घेतली. नगरपरिषदेला कर्णावट यांनी 18 ऑक्टोबर 2019 रोजी नकारात्मक अहवाल दिला व इमारत दुरुस्ती करण्यापलीकडे गेली असून ती पाडण्याची शिफारस केली. डहाणू नगरपरिषदेने स्ट्रक्चरल ऑडिटसाठी कर्णावट यांची 1 लाख 77 हजार रुपयांची फी अदा करण्याचे आदेश सोसायटीला दिले व इमारत पाडून टाकण्याचे आदेश देखील पारित केले. 1 सप्टेंबर 2020 रोजी सोसायटीने जाहिरात देवून पाडकाम करण्यासाठी कंत्राटदार नेमला व त्यासाठी आवश्यक करार करुन पाडकाम सुरु केले.

नगराध्यक्षांचा भ्रष्ट्राचाराचा आरोप
श्री जी इमारत पाडण्याचे काम चालू असताना, 20 नोव्हेंबर 2020 रोजी भारतीय जनता पक्षातर्फे माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पालघर येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी पत्रकार परिषद घेऊन काही ऑडिओ क्लिप ऐकवल्या. ह्या ऑडिओ क्लिप जिल्हाधिकाऱ्यांना देखील सादर करण्यात आल्या. ऑडिओ क्लिपमध्ये प्रदीप शहा व मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे संभाषण असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला, साहेब पैसे थोडे कमी करा असे सांगत होती. त्यावर प्रतिसाद देताना, मारवाडीचे 7, श्रीजी चे 5 आणि दोन अभियंत्याचे प्रत्येकी 50 हजार द्या असे सांगते आहे. त्यातून ही इमारत पाडून घेण्यासाठी प्रदीप शहा प्रयत्न करीत असल्याचे चित्र उभे राहिले असले तरी ऑडिओ मधील संभाषण माझे नसून तो आवाज माझा नाही असा खुलासा अतुल पिंपळे यांनी राजतंत्रशी बोलताना केला आहे. प्रदीप शहा यांनी देखील तशा स्वरूपाची तक्रार केलेली नाही. ह्या ऑडिओच्या खरेखोटेपणाबद्दल खातरजमा झालेली नाही.

सहाय्यक निबंधकांना साक्षात्कार व सोसायटीवर कारवाई:
एकीकडे श्री जी इमारतीच्या सोसायटीने बांधकाम तोडण्यास सुरुवात केल्यानंतर सहकारी संस्थेचे डहाणूचे सहाय्यक निबंधक अजय गुजराथी यांना श्री जी सहकारी सोसायटीचे कामकाज नियमानुसार होत नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी 8 सप्टेंबर 2020 रोजी आदेश काढून सहकारी अधिकारी यु. एन. चेटूले यांना तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. चेटुले यांनी लगेचच 7 दिवसांत 15 सप्टेंबर रोजी तपासणी अहवाल सादर केला. त्वरीत गुजराथी यांनी 16 सप्टेंबर रोजी सोसायटीला नोटीस देऊन 22 सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. ह्या सुनावणीसाठी सोसायटीचे वकील मकरंद गोखले कोरोनामुळे विलगीकरणात असल्यामुळे सोसायटीने खूलासा दाखल करणेकामी मुदत मागितली. गुजराथी यांनी मुदत न देता, संस्थेचे काम बंद स्वरूपात असल्याचा निष्कर्ष काढून सोसायटीवर लेखापरीक्षक आर. एल. मुगणेकर यांना अवसायक नेमण्याचे आदेश पारित केले. प्रदीप शहा व इतर काही सदस्यांच्या तक्रारी तरी स्वतंत्रपणे सुमोटो दखल घेतली असून सोसायटीला बाजू मांडण्याची पुरेपूर संधी दिल्याचा सहाय्यक निबंधक गुजराथी यांचा दावा आहे. सोसायटीवर दूषित हेतूने अथवा प्रदीप शहाच्या लाभासाठी कारवाई केल्याचा आरोप देखील गुजराथी यांनी राजतंत्रशी बोलताना फेटाळून लावला आहे.

श्री जी सोसायटीवर संकट:
श्री जी अपार्टमेंट इमारत ज्या जागेवर उभी आहे, त्या जागेचा 7/12 अजून प्रदीप शहा यांच्या नावावर आहे. जागेचे हस्तांतरण सोसायटीच्या नावावर झालेले नाही. आता इमारत पाडल्यानंतर सोसायटीचे अस्तित्व धोक्यात आल्या मुळे सोसायटीच्या 56 दुकाने व फ्लॅट मालकांवर संकट कोसळले. जर सोसायटीचे अस्तित्व संपले तर भविष्यात जागा हस्तांतरित होणार नाही व नव्याने इमारत देखील बांधता येणार नाही अशी भीती निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून सोसायटीचे सचिव राकेश खेरोडीया यांनी पाडकाम थांबवले व तळ मजला पाडायचा बाकी ठेवला. हे काम थांबवण्यासाठी पाडकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काही लाख रुपये मोजले व काम थांबले.

सोसायटीच्या अन्य सदस्यांमध्ये चलबिचल
राकेश यांची तळमजल्यावर दुकाने आहेत. त्यांनी तळमजला शाबूत ठेवल्यामुळे त्यांची मालमत्ता शाबूत राहिली असली तरी वरच्या 4 मजल्यावरील फ्लॅट धारकांचे काय? ह्या विचाराने सोसायटीच्या सदस्यांमध्ये दुही निर्माण झाली. त्याच दरम्यान 20 जानेवारी 2021 रोजी सहाय्यक निबंधक अजय गुजराथी यांनी सोसायटी बरखास्त करुन त्यावर प्रशासक नेमला. ह्या निर्णयावर जिल्हा उप निबंधकांकडे अपिल करण्यात आले असून त्यावर 10 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

23 जानेवारी रोजी पुन्हा पाडकाम सुरु
शुक्रवार दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी नगरपालिकेच्या खर्चाने बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. शनिवारी, पहाटे 5 वाजता नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा निकटवर्ती कंत्राटदार सचिन पाटील हा 2 जेसीबी व ट्रक घेऊन पाडकाम करायला जागेवर पोहोचला. एरवी विळा भोपळ्याचे नाते असलेल्या पिंपळे व राजपूत यांचे इमारत तातडीने पाडण्यावर एकमत झाले. राकेश खेरोडीया यांनी विरोध करुन एक फौजदारी केस स्वतःवर ओढावून घेतली. शनिवार व रविवार, सर्व कार्यालयांना सुट्टी असल्याने इमारत एका दिवसांत भुईसपाट झाली. त्यानंतर मात्र पुन्हा 56 लोक एकत्र येत त्यांनी ही जागा 56 लोकांच्या मालकीचा फलक लावला असला तरी त्यांच्यात एकवाक्यता मात्र उरलेली नाही.

इमारत दलालांच्या विळख्यात
आधीच रिकाम्या असलेल्या इमारतीमधील अनेक गरजवंतांनी कवडीमोल भावात फ्लॅट/दुकाने विकली आहेत. आता इमारत वादात व कोर्टकचेऱ्यांमध्ये फसल्यानंतर पुन्हा दलालांचे फावले आहे. अनेक फ्लॅट दलालांनी विकत घेणे सुरु केले असून श्रीजीची कृपा कोणावर होते, ते पुढील काळात स्पष्ट होईल.

Print Friendly, PDF & Email

comments