जिल्हा परिषदेच्या सर्व 15 रिक्त जागा खूल्या आणि पंचायत समितीच्या रिक्त 14 जागांपैकी 8 खुल्या होणार व 6 आरक्षित!

0
1532

दि. 7 मार्च: सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या 2010 च्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये असे स्पष्ट केले होते. त्यानुसार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा 50% पेक्षा अधिक करता येणार नाही असा निर्वळा दिला आहे. जेथे आधीच अनुसूचित जमातीचे आरक्षण 50% पेक्षा जास्त आहे, तेथे इतर मागासवर्गाचे आरक्षण रद्द केले आहे व जेथे अनुसूचित जमातीचे आरक्षण 50% पेक्षा कमी आहे, तेथे उर्वरीत जागा इतर मागासवर्गासाठी आरक्षित होणार आहे.

पालघर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 57 आहे. येथे अनुज्ञेय 50 टक्के आरक्षण 28 जागांवर देणे शक्य आहे. मात्र येथे अनुसूचित जमातींसाठी 37 जागा, अनुसूचित जाती साठी 1 जागा व इतर मागास वर्गासाठी 15 जागा असे आरक्षण होते. म्हणजे 57 पैकी 53 जागा आरक्षित व अवघ्या 4 जागा खूल्या होत्या. अशा पद्धतीने 93 टक्के जागा आरक्षित होत्या. आता अनुसूचित जमातीच्या 37 व अनुसूचित जातीची 1 अशा 38 जागा आरक्षित रहातील. व रद्द झालेल्या सर्व 15 जागा खूल्या वर्गात जातील. अर्थात यापैकी अर्ध्या जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असतील. असे असले तरी रद्द झालेले सर्व सदस्यांना खूल्या जागांवर निवडणूक लढविण्याचा पर्याय खूला राहिला आहे.

पालघर तालुका पंचायत समितीमध्ये 34 जागा आहेत. त्यापैकी 17 जागांवर आरक्षण अनुज्ञेय आहे. येथे अनुसूचित जातीसाठी 1 व जमातीसाठी 11 जागा आरक्षित आहेत. एकूण 12 जागा आरक्षित झाल्यानंतरही येथे आणखी 5 जागा अनुज्ञेय आहेत. यामुळे येथून रिक्त झालेल्या 9 जागांपैकी 5 जागा इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित राहतील व उर्वरित 4 जागा खूल्या होतील.

डहाणू तालुका पंचायत समितीच्या एकूण 26 जागा आहेत. येथे 13 जागांवर आरक्षण अनुज्ञेय आहे. येथे आधीच अनुसूचित जमातीसाठी आधीच 20 जागा आरक्षित असल्यामुळे आरक्षण कमी करण्यासाठी रद्द झालेल्या दोन जागा खूल्या होतील.

वाडा तालुका पंचायत समितीच्या 12 जागा आहेत. येथे 6 जागांवर आरक्षण अनुज्ञेय आहे. येथेही आधीच 7 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने रद्द झालेली 1 जागा खूली होतील.

वसई तालुका पंचायत समितीमध्ये 8 जागा आहेत. येथे 4 जागांवर आरक्षण अनुज्ञेय आहे. आधीच 3 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्या तरी येथे आणखी 1 जागा आरक्षित करणे शक्य असल्याने येथील रद्द झालेल्या 2 जागांपैकी 1 जागा इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित राहील व 1 जागा खूली होईल.

Print Friendly, PDF & Email

comments