पालघर जिल्हा परिषदेच्या 15 सदस्यांची व 14 पंचायत समिती सदस्यांची निवड रद्द

50% पेक्षा अधिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने ठरवले बेकायदेशीर

पालघर, दि. 6 मार्च : सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या रिट याचिका क्र. 980/2019 चा फैसला आला असून त्यानुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये 50% पेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही असा निर्वाळा देण्यात आला आहे. त्यानुसार ज्या जिल्हा परिषदा व पंचायत समितीमध्ये ही मर्यादा ओलांडली आहे अशा संस्थांना निकालाचा फटका बसला आहे. पालघर जिल्ह्यातील 15 जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडणूका रद्द झाल्या असून त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे, महिला व बालकल्याण सभापती सौ. अनुष्का अरुण ठाकरे, पशू संवर्धन व कृषी सभापती सुशील किशोर चुरी यांचा समावेश आहे. त्या शिवाय जिल्ह्यातील 14 पंचायत समिती सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या असून त्यामध्ये वसई तालुका पंचायत समितीच्या सभापती अनुजा अजय पाटील यांचा समावेश आहे. ह्या सर्व जागा सर्वसाधारण घोषित करण्यात आल्या असून तेथे नव्याने निवडणूका होणार आहेत.

काय आहे प्रकरण?

विकास किशनराव गवळी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, 1961 च्या अनुच्छेद 12(2)(क) च्या घटनात्मक वैध्यतेला आव्हान दिले होते. महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या मागासवर्गासाठी 27% आरक्षण दिल्यामुळे वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर व गोंदिया जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याची बाब गवळी यांनी नमूद केली होती. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने यापूर्वी ‘ के. क्रिश्ना मुर्ती व इतर विरुध्द भारत सरकार (2010) ‘ प्रकरणी दिलेल्या न्यायनिवाड्याकडे देखील लक्ष वेधले. प्रस्तुत प्रकरणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती /जमाती / इतर मागासवर्ग यांचे एकत्रित आरक्षण 50% पेक्षा अधिक असता कामा नये असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती के. जी. बालक्रिष्णन, न्या. आर. व्ही. रविंद्रन, न्या. डी. के. जैन व न्या. पी. सदाशिवम् यांच्या घटनापिठाने दिला होता. अनुसूचित जमातींसाठी अपवाद करता येईल असेही घटनापिठाने नमूद केले होते.

विकास गवळी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असतानाच 7 जानेवारी 2020 रोजी राज्यातील पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका झाल्या. ह्या निवडणूकांचा कार्यक्रम घेताना निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका क्र. 980/2019 च्या संभाव्य निकालास अधीन राहून निवडणूका होत असल्याचे जाहीर केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. ए. एम. खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. अजय रस्तोगी यांच्या 4 मार्च 2021 रोजी निकाल दिला असून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% पेक्षा अधिक आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 5 मार्च रोजी अनुसूचित जमातीच्या जागांचा अपवाद करुन, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आलेल्या 15 जिल्हा परिषद सदस्य व 14 पंचायत समिती सदस्यांच्या जागा रद्द केल्याचे जाहीर केले. त्यानुसार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी 6 मार्च रोजी आदेश निर्गमीत केले आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व 15 रिक्त जागा सर्वसाधारण घोषित करण्यात आल्या आहेत. तर पंचायत समित्यांच्या 14 रिक्त जागांपैकी पालघर पंचायत समितीच्या 4, डहाणू पंचायत समितीच्या 2 व वाडा आणि वसईची प्रत्येकी 1 अशा 8 जागा सर्वसाधारण व उर्वरीत 6 जागा इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित रहातील. रिक्त जागांसाठी नव्याने खुल्या वर्गातून निवडणूका होतील.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा फटका
पालघर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे 15 सदस्य होते. त्यातील सर्वाधिक 7 जागा रद्द झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्या खालोखाल भाजपच्या 4, शिवसेनेच्या 3 व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 1 जागा कमी झाली आहे.

रद्द झालेल्या जागा पुढीलप्रमाणे:-

पालघर जिल्हा परिषद

 1. निलेश भगवान सांबरे (23 – अलोंडे, विक्रमगड) (अपक्ष- राष्ट्रवादी कॉंग्रेस सहयोगी)
 2. अनुष्का अरुण ठाकरे (23 – मोज, वाडा) (शिवसेना)
 3. सुशील किशोर चुरी ( 18 – वणई, डहाणू) (शिवसेना)
 4. सौ. ज्योती प्रशांत पाटील (6 – बोर्डी, डहाणू) (भाजप)
 5. सौ. जयश्री संतोष केणी (11- कासा, डहाणू) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 6. सुनील दामोदर माच्छी (15- सरावली, डहाणू) भाजप
 7. अक्षय प्रवीण दवणेकर (5- उधवा, तलासरी) माकप
 8. हबीब अहमद शेख (28- आसे, मोखाडा) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 9. राखी संतोष चोथे, (29- पोशेरा, मोखाडा) (भाजप)
 10. रोहिणी रोहिदास शेलार (31- गारगांव, वाडा) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 11. अक्षता राजेश चौधरी (33 – मांडा, वाडा) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 12. शशिकांत गजानन पाटील (34- पालसई, वाडा) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 13. नरेश वामन आकरे (35- आबिटघर, वाडा) (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 14. विनया विकास पाटील (47- सावेरे एंबूर, पालघर) (शिवसेना)
 15. अनुश्री अजय पाटील (48 – नंडोरे देवखाप, पालघर) (भाजप)

पालघर तालुका पंचायत समिती

 1. मनीषा भरत पिंपळे (76- नवापूर)(शिवसेना)
 2. तनुजा गिरीष राऊत (77- सालवड)(शिवसेना)
 3. मुकेश प्रभाकर पाटील (83- सरावली अवधनगर)(शिवसेना)
 4. वैभवी विजय राऊत (84- सरावली)(शिवसेना)
 5. योगेश नारायण पाटील (87- मान)(अपक्ष)
 6. निधी राजन बांदिवडेकर (88- शिगांव खूताड)(बविआ)
 7. कस्तुरी किरण पाटील (89- बऱ्हाणपूर)(शिवसेना)
 8. महेंद्र रत्नाकर अधिकारी (91- कांढाण)(अपक्ष)
 9. सुरेश ठक्या तरे (106- नवघर घाटीम)(बविआ)

वसई तालुका पंचायत समिती

 1. अनुजा अजय पाटील (109- तिल्हेर)(बविआ) सभापती
 2. आनंद बुधाजी पाटील (107- भाताणे)(बविआ)

डहाणू तालुका पंचायत समिती

 1. स्वाती विपूल राऊत (20- ओसरविरा)(राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 2. अल्पेश रमण बारी (29- सरावली)(भाजप)

वाडा तालुका पंचायत समिती

 1. कार्तिका कांतीकुमार ठाकरे (64- सापने बुद्रूक)(मनसे)
Print Friendly, PDF & Email

comments