बोईसर एमआयडीसी : रसायनाने भरलेला ड्रम अंगावर पडून कामगार ठार

0
730

बोईसर, दि. 1 : येथील औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) विविध दुर्घटनांमध्ये कामागारांचा मृत्यू होण्याचे सत्र सुरुच असुन आता एका कारखान्यातील 24 वर्षीय तरूणाचा रसायनाने भरलेला 200 लीटर वजनाचा ड्रम अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश साहू असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असुन तो बोईसमधील लोखंडीपाडा येथील रहिवासी होता. राजेश एमआयडीसीतील प्लॉट नंबर टी-55 वर स्थित मेसर्स इंटरमिडिएट या रासायनिक कारखान्यात हेल्पर म्हणून कामाला होता. 26 फेबु्रवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास एम.एच.48/के.व्हाय. 3238 या क्रमांकाच्या ट्रकमधुन भरुन आलेले रसायनाचे ड्रम राजेश इतर सहकर्‍यांसह खाली उतरवत असताना अचानक त्याची एका ड्रमवरुन पकड सुटली व ड्रम त्याच्या अंगावर कोसळला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला जवळच्याच तुंगा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दुर्दैवाने तेथे पोहोचण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

बोईसर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असुन फॅक्टरी इन्सपेक्टर पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच कंपनी व्यवस्थापनाने मृताच्या परिवारास नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याचे कबुल केल्याचे कळते.

  • दरम्यान, बोईसर एमआयडीसीत अनेक कारखानदार कमी पगारात काम निभावून घेण्यासाठी अकुशल कामगारांना कामाला जुंपत असल्याचे तसेच कामगाराच्या क्षमतेपेक्षा अधिकचे काम त्यांना देत असल्याच्या तक्रारी नेहमीच पुढे येत असतात. परिणामी अनेक कामगारांना अशा घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
Print Friendly, PDF & Email

comments