ग्रामसेवक मनोज इंगळेने 66 लाख रोखीने काढले- अनेक आरोपांनंतरही कारवाईपासून अभय!

दि. 28 फेब्रुवारी: डहाणू तालुक्यातील वादग्रस्त ग्रामसेवक मनोज सारंगधर इंगळे याने आशागड ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणून कार्यभार सांभाळताना तब्बल 66 लाख 40 हजार रुपये रोखीने काढल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक जागृत नागरिक नरेंद्र बोभाटे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. अर्थात बोभाटे यांना ही माहिती मिळवण्यासाठी थेट माहिती आयुक्तांपर्यंत अपील करावे लागले. इंगळे यांनी ही माहिती न दिल्यामुळे बोभाटे यांनी पहिले अपील केले. अपील अधिकारी यांनी माहिती उपलब्ध करण्याचे आदेश दिल्यानंतरही साडे तीन महिने माहिती देण्यात आली नव्हती. दुसरे अपील दाखल झाल्यानंतर सुनावणी होण्याआधीच ही माहिती मिळाली आहे.

मनोज इंगळे ह्या ग्रामसेवकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असून कितीही तक्रारी झाल्या तरी त्याच्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही. ह्या ग्रामसेवकाकडे तालुक्यातील चिखले, नरपड व आशागड अशा 3 ग्रामपंचायतींचा पदभार देण्यात आला होता. नरपड येथे तक्रारी उद्भवल्यानंतर तेथून पदभार काढून घेण्यात आला होता.

मनोज इंगळे याने आशागड ग्रामपंचायतीचा पदभार सांभाळताना असोसिएटेड कॅप्सुल ह्या कंपनीला ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारले असताना ते दिल्याचा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा भूखंड भ्रष्ट्र मार्गाने बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एसीजी कॅप्सुल कंपनीने एसीजी केअर या नावाने आशागड ग्रामपंचायतीच्या खात्यात 8 जानेवारी 2020 रोजी 4 लाख 20 हजार जमा केले आहेत. इंगळेने यातील 4 लाख लगेचच रोखीने काढून विल्हेवाट लावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा भूखंड ज्या काकरीया बिल्डर्सच्या ताब्यात देण्यात आला त्या बिल्डर्सने त्यापोटी 1 जानेवारी 2020 रोजी आशागड ग्रामपंचायतीला धनादेशाद्वारे 5 लाख रुपये दिले होते. इंगळेने एकाच दिवसांत 2 लाख व 2 लाख 99 हजारांच्या धनादेशाद्वारे हे पैसे रोखीने काढले. इंगळे याने रोखीने पैसे काढताना जवळपास 44 लाख रुपये इंगळेचा हस्तक असलेल्या वाहनचालक एस. के. वर्माच्या नावाने काढले आहेत. व उर्वरीत रक्कम स्वतः काढली आहेत. त्या शिवाय अनेक वादग्रस्त व्यवहार केल्याचे आढळले आहे. मनोज इंगळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित निलंबित करुन त्याच्या भ्रष्ट्राचाराची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments