पालघर, दि. 25 : करोना कालावधी व त्यापुर्वी विविध कारणांमुळे निधन झालेल्या 17 पोलीस कर्मचार्यांच्या पाल्यांची तसेच पोलीस पत्नींची अनुकंपा तत्वावर पालघर पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 23 फेबु्रवारी रोजी आयोजित एका कार्यक्रमात संबंधित पाल्य व पोलीस पत्नींना राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे ही प्रक्रिया केवळ 20 दिवसात पार पाडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व कोकण परिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंध पोलीस पाल्य व पोलीस पत्नींना पालघर पोलीस दलात नवप्रविष्ठ पोलीस शिपाई म्हणुन समाविष्ट करुन त्यांना गौरविण्यात आले. पालघर जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने अनुकंपा तत्वावर भरती करण्यात आली असल्याचे पालघर पोलीस दलातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. नियुक्तीची ही प्रक्रिया पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (गृह) शैलश काळे, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, राखीव पोलीस उपनिरीक्षक कदम, वरीष्ठ लिपीक विलास गोविंद व सतीश काटकर यांनी पार पाडली.
दरम्यान, कोरोना कालावधीसारख्या अडचणीच्या वेळी पोलीस प्रशासनाने केलेली मदत व पालकांच्या जागी केलेल्या नियुक्तीमुळे नवनियुक्त पोलीस शिपाई भारावुन गेले.